Sunday, November 16, 2025 11:48:52 PM

BrahMos: 'पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच आमच्या ब्रह्मोसच्या आवाक्यात...'; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

या कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे फक्त शस्त्र नसून, भारताच्या तांत्रिक कौशल्याचे आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.

brahmos पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच आमच्या ब्रह्मोसच्या आवाक्यात राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

Rajnath Singh On BrahMos: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी लखनौ येथे झालेल्या ब्रह्मोस एरोस्पेस युनिटच्या कार्यक्रमात पाकिस्तानला थेट इशारा दिला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पाकिस्तानच्या भूमीचा प्रत्येक इंच आता भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या आवाक्यात आहे. ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक ट्रेलर होते, पण त्यातून जगाला भारताची लष्करी ताकद आणि स्वावलंबन दिसून आले. भारत आता कोणत्याही बाह्य दबावाखाली येणार नाही, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 

ब्रह्मोस हे भारताच्या सामर्थ्याचे प्रतीक

या कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे फक्त शस्त्र नसून, भारताच्या तांत्रिक कौशल्याचे आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आज भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाचा कणा बनले आहे. त्याची अचूकता, वेग आणि शक्ती यामुळे ते जगातील सर्वाधिक विश्वासार्ह प्रणालींपैकी एक ठरले आहे.

हेही वाचा - Pakistan vs Afghanistan : पाकिस्तानी हवाई हल्ल्यात 3 अफगाण क्रिकेटपटूंसह 6 ठार; रशीद खान संतापला, तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय!

तंत्रज्ञानाचे नवे केंद्र

राजनाथ सिंह यांनी आपल्या मतदारसंघ लखनौच्या प्रगतीचा उल्लेख करत सांगितले की, लखनौ आता केवळ तहजीब आणि संस्कृतीचे नव्हे, तर संरक्षण तंत्रज्ञानाचे केंद्र बनले आहे. लखनौमध्ये ब्रह्मोस युनिटचे उद्घाटन 11 मे 2025 रोजी झाले असून, अवघ्या पाच महिन्यांत येथून क्षेपणास्त्र निर्मिती सुरू होईल. दरवर्षी सुमारे 100 क्षेपणास्त्र प्रणालींचे उत्पादन येथे होईल, असेही त्यांनी सांगितले.

या युनिटसाठी 200 एकर क्षेत्रफळ आणि 380 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. तथापी, राजनाथ सिंह म्हणाले की, भारत आता क्षेपणास्त्र प्रणालीसाठी लागणारे सर्व घटक स्वदेशी उद्योगांतूनच तयार करेल. यामुळे परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व संपेल आणि देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. ते म्हणाले, ब्रह्मोस आता ‘मेड इन इंडिया’ उत्पादन नसून ‘ब्रँड इंडिया’चे प्रतीक बनले आहे. सध्या फिलीपिन्ससोबत निर्यात करार झाला असून लवकरच इतर देशांसोबतही करार होणार असल्याचे संकेत राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. 

हेही वाचा - Asim Munir Threat to India: 'पाकिस्तान भारताला प्राणघातक प्रत्युत्तर देईल...'; असीम मुनीर यांची भारताला पुन्हा धमकी

पाकिस्तानला स्पष्ट इशारा

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत राजनाथ सिंह म्हणाले, तो फक्त एक नमुना होता. पण त्यामुळे पाकिस्तानला आणि जगाला संदेश गेला की, भारताकडे आपले रक्षण करण्याची आणि प्रत्युत्तर देण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यांनी अभियंते आणि तंत्रज्ञांना उद्देशून सांगितले की, हा आत्मविश्वास टिकवणे आणि राष्ट्राच्या सुरक्षेला बल देणे ही तुमची जबाबदारी आहे.

योगी सरकारचे कौतुक

दरम्यान, राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही कौतुक केले. ते म्हणाले, योगी सरकारच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश स्वावलंबन, सुरक्षा आणि उद्योग क्षेत्रात नवा इतिहास रचत आहे. ब्रह्मोस प्रकल्पामुळे केवळ संरक्षण क्षेत्रच नव्हे तर शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.


सम्बन्धित सामग्री