Haldiram: सणासुदीच्या काळात घराघरांत गोडधोडाची रेलचेल असते. पाहुणचार, पूजा, समारंभ यासाठी मोठ्या प्रमाणावर मिठाई आणि नमकीन पदार्थांची खरेदी केली जाते. याच काळात ग्राहक बहुतेक वेळा प्रसिद्ध आणि नामांकित ब्रँडवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. मात्र अन्न सुरक्षा विभागाच्या अलीकडील कारवाईनंतर हा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने (FSDA) विशेष मोहीम राबवत काही ठिकाणी छापे टाकले. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी ही तपासणी करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान एका नामांकित मिठाई ब्रँडच्या वेअरहाऊसमध्ये मुदत संपलेला साठा आढळून आला. तपास अधिकाऱ्यांना तब्बल 112 किलो एक्सपायर्ड मिठाई सापडल्याची माहिती समोर आली. हा साठा त्वरित जप्त करून नष्ट करण्यात आला.
या कारवाईपुरतेच प्रकरण मर्यादित राहिले नाही. शहरातील विविध भागांत छापे टाकण्यात आले असता मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त साहित्य आढळून आले. सुमारे 10 हजार किलोहून अधिक मसाले आणि मावा संशयास्पद अवस्थेत सापडला. या जप्त मालाची किंमत अंदाजे 55 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही कोल्ड स्टोरेजमध्येही मोठ्या प्रमाणावर साठवलेला मावा आणि मसाले तपासणीसाठी जप्त करण्यात आले.
SHOCKER ? होली से पहले Haldiram's के लखनऊ स्थित गोदाम से 1 क्विंटल एक्सपायर्ड सोनपापड़ी बरामद की गई। Dainik Bhaskar की रिपोर्ट के अनुसार, खाद्य सुरक्षा विभाग ने छापेमारी के दौरान यह कार्रवाई की। मामले की जांच जारी है। pic.twitter.com/bjGFIbFxfc — Ocean Jain (@ocjain4) February 27, 2026
सणांच्या काळात मिठाईची मागणी झपाट्याने वाढते. याच संधीचा फायदा घेत काही विक्रेते जुना किंवा निकृष्ट दर्जाचा माल बाजारात आणतात, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मिठाई, पेडे, रसगुल्ले, गुजिया तसेच पनीर यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
या घटनेनंतर ग्राहकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. मोठा ब्रँड म्हणजे हमखास दर्जा चांगलाच असेल, असे समजणे धोकादायक ठरू शकते. पॅकेटवरील उत्पादन दिनांक आणि एक्सपायरी तारीख नीट तपासणे अत्यावश्यक आहे. तसेच खरेदी करताना अधिकृत पावती घेणेही महत्त्वाचे ठरते. कोणताही संशयास्पद वास, चव किंवा रंग आढळल्यास संबंधित तक्रार अन्न सुरक्षा विभागाकडे करता येते.
अन्न सुरक्षा विभागाच्या या कारवाईमुळे सणासुदीच्या काळातील भेसळीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तपास अधिक कडक करण्याचे संकेत दिले असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना वाचवले जाणार नाही, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.
सण आनंदाचा असतो, पण अन्नपदार्थांच्या बाबतीत थोडीशी निष्काळजीपणा मोठी अडचण निर्माण करू शकतो. त्यामुळे गोडधोड खरेदी करताना खबरदारी घेणे आणि सजग ग्राहक बनणे हीच काळाची गरज आहे.