भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) देशभरात अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या नामांकित कंपन्यांवर धडक कारवाई सत्र सुरू केले आहे. दिल्लीतील प्रसिद्ध ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेल चालवणाऱ्या ‘एबी हॉटेल्स लिमिटेड’सह ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘बिगबास्केट’ला एफएसएसएआयने कारण दाखवा व सुधारणा नोटिसा बजावल्या आहेत. याशिवाय, अस्वच्छतेच्या आणि नियमांच्या उल्लंघनाच्या गंभीर प्रकरणात ‘डीएनव्ही फूड प्रॉडक्ट्स लिमिटेड’ या कंपनीचा अन्न सुरक्षा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.
रॅडिसन ब्लूच्या स्वयंपाकघरात झुरळे, माश्या आणि खराब तेलाचा वापर
दरम्यान, 16 ऑक्टोबर रोजी एफएसएसएआयच्या पथकाने दिल्लीतील रॅडिसन ब्लू हॉटेलच्या स्वयंपाकघरात अचानक पाहणी केली. या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. किचनमधील उपकरणांवर गंज लागलेला आढळला, फ्रीझरमधून गळती होत होती आणि व्हेंटिलेशनची व्यवस्था अत्यंत निकृष्ट दर्जाची होती. इतकेच नव्हे तर, स्वयंपाकघरात ठिकठिकाणी साचलेले पाणी, ड्रेनेजची दुर्गंधी, झुरळे आणि माश्यांचा वावर आढळून आला. तपासात बुरशी लागलेली फळे व भाज्या वापरल्या जात असल्याचे निष्पन्न झाले. खाद्यतेलाच्या चाचणीत ‘टोटल पोलर कंपाउंड्स’ (TPC) चे प्रमाण नियमांनुसार जास्तीत जास्त 25 टक्के असणे आवश्यक असताना ते 31 आणि 24.4 इतके भयानक आढळले. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाला तातडीने सुधारणा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी फ्लिपकार्ट आणि बिगबास्केट अडचणीत
‘फ्रीडम कुकिंग राईस ब्रॅन ऑईल’ या तेलाच्या जाहिरातीत ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल कमी करून ‘चांगले’ कोलेस्ट्रॉल वाढवण्याचा आणि ह्दयरोग नियंत्रणात ठेवण्याचा खोटा व दिशाभूल करणारा दावा केला जात होता. ‘अन्न सुरक्षा व मानके नियम, 2018’ नुसार खाद्यतेलाबाबत असे आरोग्यविषयक दावे करण्यास पूर्ण मनाई आहे. तरीही सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अशा जाहिराती दाखवल्या जात असल्यामुळे ‘फ्लिपकार्ट’, ‘बिगबास्केट’ (इनोव्हेटिव्ह रिटेल कन्सेप्ट्स) आणि तेल उत्पादक कंपनी ‘जेमिनी एडिबल्स’ला नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. तसेच जेमिनी एडिबल्सकडे ई-कॉमर्स विक्रीसाठी आवश्यक असलेला अधिकृत परवाना नसतानाही ते विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा – मुलांच्या स्क्रीन टाईमवर येणार अंकुश? सुप्रीम कोर्टात याचिका, न्यायालयाची केंद्राला ‘ही’ नोटीस
डीएनव्ही फूड प्रॉडक्ट्सचा परवाना निलंबित
दुसऱ्या एका कारवाईत, ‘डीएनव्ही फूड प्रॉडक्ट्स लिमिटेड’च्या कारखान्यात कमालीची अस्वच्छता, कोळीष्टके आणि साचलेले पाणी आढळले. अगदी पापडांसारख्या थेट खाण्यायोग्य पदार्थांवर माश्या बसलेल्या आढळल्यामुळे प्राधिकरणाने या कंपनीचा परवाना तत्काळ निलंबित केला आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि शुद्ध अन्नपदार्थ मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि जाहिरातींद्वारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही लहान-मोठ्या ब्रँडची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा एफएसएसएआयने दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.