गाझियाबाद (उत्तर प्रदेश) : शहरात बुधवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप नगरसेविका शीतल चौधरी यांच्या कारवर अज्ञात बाइकस्वारांनी गोळीबार केला. हा हल्ला कमला नेहरू नगर परिसरात एनएचआरएफ रोडवर झाला, जेव्हा त्या नोएडाहून आपल्या घरी परतत होत्या. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र त्यांच्या पांढऱ्या क्रेटा कारची पुढील काच पूर्णपणे फुटली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे 8:30 वाजता घडली. शीतल चौधरी या गोविंदपुरमहून संजय नगरकडे आपल्या कारने एकट्याच जात होत्या. त्याचवेळी दोन हेल्मेटधारी अज्ञात तरुण मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी अचानक त्यांच्या कारला ओव्हरटेक करून दोन फायर राउंड केले. गोळी कारच्या विंडशील्डवर आदळली, परंतु शीतल यांनी प्रसंगावधान राखत वाहनाचा तोल न गमावता कार सुरक्षित स्थळी नेली.
घटनेची माहिती मिळताच कविनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसरात नाकेबंदी करून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेण्याचे काम सुरू केले आहे.
हेही वाचा: Phaltan Doctor death: डॉक्टर तरुणी रात्री हॉटेलमध्ये आली तेव्हा देहबोली..., निंबाळकरांच्या मर्जीतील हॉटेल मालकाने सगळंच सांगितलं
गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणाला गंभीरतेने घेत चार विशेष तपास पथकं तयार केली आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “हल्लेखोरांचा शोध सुरू आहे आणि प्रत्येक दृष्टीने तपास केला जात आहे.” प्राथमिक तपासात हे सुनियोजित हल्ल्याचे प्रकरण असू शकते, असे दिसत आहे, मात्र अद्याप कोणत्याही राजकीय किंवा वैयक्तिक वैराचा पुरावा मिळालेला नाही.
शीतल चौधरी या भाजपच्या गाझीयाबादमधील स्थानिक नगरसेविका असून, परिसरात त्यांच्या सक्रीय राजकीय आणि सामाजिक कार्यामुळे ओळखल्या जातात. पोलिस हल्लेखोरांना लवकरच अटक करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा: Mamta Kulkarni Statement: दाऊद इब्राहिमवरील वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर ममता कुलकर्णीचे स्पष्टीकरण