Energy Crisis in the World due to Middle East Tension : रशिया-युक्रेन युद्धाला 4 वर्षे पूर्ण होत असतानाच, आता अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा संकट अधिक गडद झाले आहे. इराणने 'स्ट्रॅट ऑफ होर्मुज' हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद केल्यामुळे जगभरात तेल आणि वायूचा पुरवठा विसकळीत झाला आहे. या संकटामुळे दक्षिण आशियातील अनेक देशांवर अक्षरशः 'एनर्जी लॉकडाऊन'ची वेळ आली असून, दैनंदिन जीवन विसकळीत झाले आहे. जगातली इंधन टंचाईची परिस्थिती अभूतपूर्व आहे. प्रत्येक देश स्वतःचा भविष्यकाळ सुरक्षित करू पाहात आहे. यामुळे प्रत्येकाला इंधन हवे आहे.
हे देश बहुतेक भारताचे शेजारी देश असून तेथे आधीच राजकीय अराजक आणि अंदाधुंदी कारभाराची परिस्थिती आहे. यामुळे येथील सरकारे फारशी बळकट आणि परिस्थितीशी दोन हात करू शकणारी नाहीत. यामुळे या देशांमधील अंतर्गत अनागोंदीमुळे यांना जागतिक तणावजन्य स्थितीचा वेगाने फटका बसला आहे. सविस्तर जाणून घेऊ, हे देश कोणते आहेत.
1. श्रीलंका (Sri Lanka)
इंधन टंचाईमुळे श्रीलंकेने दर बुधवारी सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर केली आहे. आता शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये आठवड्यातून केवळ 4 दिवसच काम होईल. मात्र, आरोग्य आणि इमिग्रेशन सारख्या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. खाजगी कारला एकावेळी केवळ 15 लिटर, तर दुचाकींना 5 लिटरच इंधन दिले जात आहे. परिस्थिती न सुधारल्यास पूर्ण 'एनर्जी लॉकडाऊन' लागू करण्याचा विचार तिथे सुरू आहे.
2. म्यानमार (Myanmar)
म्यानमारमध्ये इंधन बचतीसाठी वाहनांसाठी 'ईव्हन-ऑड' (Even-Odd) नियम लागू करण्यात आला आहे. ज्या गाड्यांच्या नंबर प्लेटची सुरुवात 0, 2, 4, 6, 8 ने होते, त्या सम तारखेला चालतील आणि 1, 3, 5, 7, 9 ने सुरुवात होणारी वाहने विषम तारखेला रस्त्यावर उतरतील. म्यानमार सरकार देखील लवकरच लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकते.
3. पाकिस्तान (Pakistan)
पाकिस्तानमधील शेहबाज शरीफ सरकारने इंधन संकटामुळे शाळांना 2 आठवड्यांची सुट्टी जाहीर केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी वर्क-फ्रॉम-होम (WFH) अनिवार्य केले आहे. सिंध प्रांतातील स्थानिक स्वराज्य संस्था मंत्र्यांच्या मते, इंधन वाचवण्यासाठी सरकार 'स्मार्ट लॉकडाऊन' लावण्याच्या तयारीत आहे.
4. बांग्लादेश (Bangladesh)
बांगलादेशात पेट्रोलचे दर प्रति लिटर 300 टका पार गेले आहेत. अनेक पेट्रोल पंप बंद झाले असून जे सुरू आहेत तिथे लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वीज कपातीचे संकटही गडद झाले असून रमजानपासूनच शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. इंधनाच्या तुटवड्यामुळे जनजीवन पूर्णपणे विसकळीत झाले आहे.
5. व्हिएतनाम (Vietnam)
व्हिएतनाममध्ये इंधनाच्या किमतीत 50-60 टक्के वाढ झाली आहे. याचा मोठा फटका विमान वाहतूक क्षेत्राला बसला असून एप्रिलपासून उड्डाणे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व कार्यालयांना वर्क-फ्रॉम-होमचे आदेश दिले असून अनावश्यक प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास लॉकडाऊन हाच अंतिम पर्याय असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
भारताची स्थिती काय आहे?
इतर शेजारील देशांच्या तुलनेत भारताची स्थिती समाधानकारक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केले की, भारतात कोणताही लॉकडाऊन लावला जाणार नाही. देशात पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅसची उपलब्धता पुरेशी आहे. केवळ साठेबाजांवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले असून, Covid-19 प्रमाणेच या संकटाचा सामना सांघिक भावनेने करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.