Goa Club Fire Incident: गोवा आग दुर्घटनेतील क्लब मालक थायलंडला फरार, फुकेतमध्ये असल्याची माहिती समोर

प्रशासनाने सुरक्षा प्रक्रियांबाबत विस्तृत तपासणी सुरू केली असून सर्व क्लब आणि इव्हेंट स्थळांना सात दिवसांत अंतर्गत सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत.

Goa Club Fire Incident: गोवा आग दुर्घटनेतील क्लब मालक थायलंडला फरार, फुकेतमध्ये असल्याची माहिती समोर

गोव्यातील अरपोरा येथील बर्च बाय रोमिओ लेन (Birch by Romeo Lane) या क्लबमध्ये शनिवारी उशिरा रात्री लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा (Saurabh & Gaurav Luthra) हे देशाबाहेर पळाल्याची माहिती समोर आली आहे. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडल्यानंतर काही तासांतच दोघांनी फुकेत (Phuket) येथे जाण्यासाठी मुंबई विमानतळावरून पोहचले. दुर्घटनेनंतर रविवारी गोवा पोलिसांनी लुथरा भावांविरुद्ध FIR नोंदवून त्यांच्या दिल्लीतील पत्त्यांवर छापे टाकले. मात्र ते ठिकाणी न मिळाल्याने पोलिसांनी त्यांच्या घरावर कायदेशीर नोटीस चिकटवली. याच दिवशी इमिग्रेशन विभागाकडून त्यांच्या नावावर लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले.

तपास संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही आग लागल्यानंतर काही तासांत भारतातून थायलंडला रवाना झाले. घटनेच्या तपासासाठी गोवा पोलिसांनी CBI च्या इंटरपोल विभागाशी संपर्क साधला असून लुथरा भावांविरुद्ध ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही नोटीस आरोपींचे स्थान, ओळख आणि हालचालींबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक माहिती मिळवण्यासाठी जारी केली जाते. भारत आणि थायलंड यांच्यात 2015 पासून प्रत्यार्पण करार कार्यान्वित असल्यामुळे पुढील कारवाईची शक्यता वाढली आहे.

हेही वाचा: Priyanka Gandhi Vs PM Narendra Modi : प्रियांका गांधींनी मोदींचे नेहरुंवरील आक्षेप फेटाळले म्हणाल्या, "जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान तेवढे दिवस नेहरु…"

या प्रकरणातील FIR मध्ये क्लबमध्ये गंभीर सुरक्षात्मक त्रुटी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आग लागली तेव्हा क्लबमध्ये आवश्यक आगसुरक्षा साधने, आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग (Emergency Exit) आणि इमारतीसाठी आवश्यक परवाने उपलब्ध नव्हते. पोलिसांनी क्लबच्या जनरल मॅनेजरसह पाच जणांना अटक केली आहे. तसेच क्लबचे दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या एका व्यक्तीला दिल्लीमधून ताब्यात घेण्यात आले.

लुथरा बंधूंची गेल्या काही वर्षांत हॉस्पिटॅलिटी उद्योगात जलद वाढ झाली होती. रोमिओ लेन (Romeo Lane), बर्च (Birch) आणि इतर रेस्टोबार्स त्यांनी देशातील अनेक शहरांत तसेच दुबईत उघडले होते. मात्र गोव्यातील या क्लबने परवाना संपल्यानंतरही व्यवसाय सुरू ठेवला होता, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.

स्थानिक प्रशासनाला हे ठिकाण सील करण्याचा अधिकार असतानाही कारवाई न केल्याचेही स्पष्ट झाले आहे. भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने सर्व नाइटक्लब, रेस्टॉरंट आणि इव्हेंट स्थळांना सात दिवसांत अंतर्गत सुरक्षा तपासणी (Internal Safety Audit) करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली असून ती परवान्यांतील त्रुटी, जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका आणि दुर्घटनेची कारणे तपासणार आहे. ओळख पटलेले सर्व मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. दोन इतर व्यावसायिक स्थळे जी रोमिओ लेनच्या मालकीची आहेत ती महसूल विभागाने सील केली आहेत. घटनेची संपूर्ण जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलिस आणि राज्य प्रशासनाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा: Gold Stolen in Train: रेल्वेत मध्यरात्रीचा थरार; लॉक केलेली बॅग गायब, पाच कोटींच्या सोन्याची रहस्यमय चोरी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number