मुंबई: सराफा बाजारात सध्या सोने आणि चांदीच्या किमतीने अक्षरशः गगनभरारी घेतली असून गुंतवणूकदारांसाठी ही मोठी पर्वणी ठरत आहे. जागतिक स्तरावर अमेरिकेतील व्याजदरात होणारी संभाव्य कपात आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून मौल्यवान धातूंकडे वाढलेला कल यामुळे सोने-चांदीच्या दरांनी सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस 4391.92 डॉलरच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला असून चांदीनेही प्रति औंस 69.23 डॉलरचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर गाठला आहे. मौल्यवान धातूंमधील ही अभूतपूर्व तेजी पाहता गुंतवणूकदार सध्या सुखावले असून बाजारपेठेत कमालीचे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे परताव्याच्या शर्यतीत यावेळेस चांदीने सोन्यालाही मागे टाकले आहे. सन 2025 मध्ये चांदीच्या किमतीत तब्बल 138 टक्के वाढ झाली असून सोन्याच्या तुलनेत चांदीने गुंतवणूकदारांना कित्येक पट अधिक नफा मिळवून दिला आहे. औद्योगिक मागणीतील वाढ आणि पुरवठ्याची असलेली कमतरता यामुळे चांदीचे दर वधारले आहेत. तज्ज्ञांच्या मते हा वाढीचा कल आगामी काळातही असाच कायम राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी आधीच गुंतवणूक केली आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णकाळापेक्षा कमी नाही.
भारतीय वायदा बाजारातही या तेजीचे पडसाद उमटले आहेत. सोन्याच्या वायद्याची किंमत 1436 रुपयांच्या वाढीसह 138180 रुपयांवर पोहोचली आहे. तर चांदीने 3127 रुपयांची मोठी झेप घेत 216000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सराफा बाजारात सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 124810 रुपये असून शुद्ध म्हणजेच 24 कॅरेट सोने 136160 रुपये प्रति दहा ग्रॅमवर स्थिरावले आहे. किमती वाढल्या असल्या तरी सोन्यातील गुंतवणूक ही कधीही तोट्याची ठरत नाही असा ग्राहकांचा विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरताना दिसत आहे.
सध्याच्या किमतींमुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर परिणाम झाला असला तरी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी सोने हा आजही सर्वात विश्वासार्ह पर्याय ठरत आहे. या वर्षाप्रमाणेच पुढील वर्षीही सोने-चांदीतून असाच बंपर परतावा मिळेल अशी चिन्हे असल्याने नवीन गुंतवणूकदारही आता मोठ्या संख्येने बाजाराकडे आकर्षित होत आहेत. किमती कितीही वाढल्या तरी सोन्याचे आकर्षण कधीही कमी होत नाही हेच या विक्रमी दरवाढीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.