Kedarnath Yatra 2026: उत्तराखंडमधील खराब हवामानामुळे तात्पुरती रोखण्यात आलेली प्रसिद्ध केदारनाथ यात्रा अखेर शनिवारी सकाळपासून पुन्हा एकदा पूर्ववत झाली आहे. निसर्गाचे संकट दूर होताच आणि प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळताच भाविकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी आसुसलेले 10,000 हून अधिक भाविक तातडीने सोनप्रयाग आणि गौरीकुंड या तळांवरून धामकडे रवाना झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रवासी हवामान कधी सुधारेल याची वाट पाहत थांबले होते. यात्रा पुन्हा सुरू झाल्याने आणि दर्शन घेऊन परतणाऱ्या भक्तांमुळे संपूर्ण डोंगराळ मार्ग पुन्हा एकदा जय केदारच्या घोषाने गजबजून गेला आहे.
सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात
केदारनाथ परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून शुक्रवारी प्रशासनाने यात्रा थांबवली होती. अनेक प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी थांबवून ठेवण्यात आले होते. रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, डोंगराळ मार्गावरील भाविकांची सुरक्षा हीच त्यांची मुख्य प्राथमिकता आहे. प्रवाशांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तातडीने मदत मिळावी यासाठी स्थानिक पोलीस, एसडीआरएफ (SDRF) आणि आपत्ती व्यवस्थापन पथके संपूर्ण मार्गावर चोवीस तास कडक पाळत ठेवून आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या यात्रेत आतापर्यंत तब्बल 11 लाख भाविकांनी केदारनाथचे यशस्वी दर्शन घेतले आहे.
श्रद्धा आणि मोक्षाचे केंद्र
हिमालयीन पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून तब्बल 11,755 फूट उंचीवर वसलेले केदारनाथ धाम हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि दुर्गम तीर्थक्षेत्र मानले जाते. हिंदू पुराणानुसार, भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथला सर्वोच्च स्थान आहे, तसेच ते 'चार धाम' यात्रेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. महाभारत युद्धानंतर आपल्या पापांच्या क्षालनासाठी आणि भगवान शिवाचा शोध घेत पांडव याच ठिकाणी आले होते, अशी ऐतिहासिक आख्यायिका या स्थळाला लाभली आहे. येथे येथे येऊन मनोभावे पूजा केल्याने आध्यात्मिक शांती आणि मोक्षाची प्राप्ती होते, या अढळ श्रद्धेपोटी दरवर्षी लाखो भाविक कठीण चढण पार करून येथे येतात.
हेही वाचा – Today Horoscope 2026: आज काही राशींच्या आयुष्यात येणार सकारात्मक बदल; वाचा संपूर्ण राशिभविष्य
22 एप्रिलपासून सुरू झालेली यात्रा पुढील 6 महिने राहणार खुली
यंदाच्या वर्षात 22 एप्रिल 2026 रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर केदारनाथ धामचे कपाट (दरवाजे) देश-विदेशातील भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. डोंगराळ भागातील कडाक्याची थंडी आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता हे मंदिर पुढील 6 महिन्यांच्या कालावधीसाठीच खुले राहणार आहे. त्यानंतर हिवाळ्यात येथील उत्सवमूर्ती खाली उखीमठ येथे आणली जाते. निसर्गाचे चढउतार झेलत बाबा केदारांच्या दर्शनाचा हा भक्तीसोहळा पुढील काही महिने असाच अविरत सुरू राहणार आहे.