Saturday, May 17, 2025 10:08:05 PM

मॉक ड्रिल संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन

देशभरात 7 मे रोजी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, दिल्ली येथे केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांचे मुख्य सचिव आणि नागरी सचिव यांची महत्वाची बैठक पार पडत आहे.

मॉक ड्रिल संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन

दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, देशभरात 7 मे रोजी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. यादरम्यान, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता मंगळवारी दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यासोबतच, दिल्ली येथे केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांचे मुख्य सचिव आणि नागरी सचिव यांची महत्वाची बैठक पार पडत आहे.

देशातील 244 जिल्ह्यांत होणार मॉक ड्रिल:

सध्या दिल्ली येथे होत असलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. माहितीनुसार, केंद्रीय गृहसचिव यांच्या बैठकीमध्ये राज्यांचे मुख्य सचिव आणि नागरी संरक्षण प्रमुख व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच, ही बैठक देशातील 244 जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षणाच्या तयारीसंदर्भात होत आहे. या बैठकीमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे अधिकारी उपस्थित असणार आहेत.

हेही वाचा: महाराष्ट्रात 'या' 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार; जाणून घ्या

मुख्यमंत्र्यांना दिली जाणार माहिती:

दिल्ली येथील केंद्रीय गृहसचिव यांच्या बैठकीनंतर देशातील विविध मुख्यमंत्र्यांना या बैठकीची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. सोबतच, केंद्रीय गृहविभाग यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मॉक ड्रिल संदर्भात विविध मुख्यमंत्र्यांना याची माहिती दिली जाणार आहे.

नाशिक येथे मॉक ड्रिलची जोरदार तयारी:

7 मे रोजी होणाऱ्या मॉक ड्रिलची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मॉक ड्रिलसाठी देशभरासह नाशिकमध्ये देखील जोरदार तयारी सुरू आहे. मॉक ड्रिल संदर्भातील एक महत्त्वाची नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. मॉक ड्रिलसाठी आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अग्निशमन दल आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मॉक ड्रिलसाठी आवश्यक साहित्याची जमवाजमव सुरू झाली आहे. प्राथमिक उपकरणांपासून ते वैद्यकीय मदतीपर्यंत तयारी सुरू आहे. रुग्णवाहिका, वायरलेस सिस्टम आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. यादरम्यान, प्रशिक्षित पथकांची नियुक्ती करण्यात येत आहे. नाशिक प्रशासनाने नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

राज्य सरकार अलर्ट मोडवर:

यादरम्यान, मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे. तसेच, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आला आहे. पालकमंत्री यांच्यासह सर्व मंत्र्यांना प्रशासनाच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


सम्बन्धित सामग्री