Crime News: ऑम्लेटचा एक तुकडा, AIची मदत आणि पोलिसांची हुशारी; कसा झाला ब्लाइंड मर्डरचा खुलासा?

ग्वाल्हेरमधील ब्लाइंड मर्डर प्रकरणाचा पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने उलगडा केला.

Crime News: ऑम्लेटचा एक तुकडा, AIची मदत आणि पोलिसांची हुशारी; कसा झाला ब्लाइंड मर्डरचा खुलासा?

Gwalior Case: मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सुरुवातीला पोलिसांसमोर पूर्णपणे ‘ब्लाइंड मर्डर’ असलेली ही केस अखेर एका छोट्याशा धाग्यामुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उलगडली. विशेष म्हणजे, या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) महत्त्वाचा ठरला आणि एका ऑम्लेटच्या तुकड्याने थेट आरोपीपर्यंत पोलिसांना पोहोचवलं.

ग्वाल्हेरच्या हद्दीतील एका निर्जन डोंगराळ भागात एका महिलेचा अत्यंत विद्रूप अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. हत्येची पद्धत इतकी क्रूर होती की, मृतदेहाची ओळख पटवणं जवळपास अशक्य झालं होतं. चेहरा दगडाने ठेचून काढण्यात आला होता, डोक्याला गंभीर जखमा होत्या. घटनास्थळी कोणतेही ओळखीचे कागदपत्र किंवा मोबाईल सापडला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं.

सुरुवातीला पोलिसांनी पारंपरिक तपास पद्धतींचा अवलंब केला. परिसरातील बेपत्ता महिलांच्या तक्रारी तपासल्या, आसपासच्या गावांमध्ये चौकशी केली; मात्र काहीच ठोस माहिती मिळत नव्हती. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं आणि तपासाला नवी दिशा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला. तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने एआय सॉफ्टवेअर वापरून मृत महिलेच्या कवटी आणि उपलब्ध अवशेषांच्या आधारे तिचा संभाव्य चेहरा डिजिटल स्वरूपात तयार करण्यात आला. हा चेहरा परिसरातील दुकानदार, रस्त्यावरील विक्रेते आणि स्थानिक नागरिकांना दाखवण्यात आला. याच टप्प्यावर तपासाला निर्णायक वळण मिळालं.

एका अंडेविक्रेत्याने हा चेहरा पाहताच ती महिला ओळखल्याचं सांगितलं. काही दिवसांपूर्वी ती महिला दोन पुरुषांसोबत त्याच्या ठेल्यावर ऑम्लेट खाण्यास आली होती, अशी माहिती त्याने दिली. याच माहितीमुळे पोलिसांना मृत महिलेच्या हालचालींचा मागोवा घेता आला. पुढील तपासात सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आणि परिसरातील इतर दुकानदारांकडूनही माहिती गोळा करण्यात आली.

तपास पुढे सरकत असताना पोलिसांना कळलं की मृत महिला शेवटच्या वेळी तिच्या ओळखीच्या एका युवकासोबत दिसली होती. संशयाची सुई तिच्या बॉयफ्रेंडकडे वळली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या आरोपीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने सांगितलं की, त्याचे आणि मृत महिलेचे प्रेमसंबंध होते. मात्र ती दुसऱ्या कुणाशी तरी बोलत असल्याचा त्याला संशय होता. याच संशयातून त्याने तिचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. फिरायला नेण्याच्या बहाण्याने तिला डोंगरावर बोलावलं, वाटेत प्रेमाने ऑम्लेट खायला घातलं आणि नंतर निर्जन ठिकाणी नेऊन तिची निर्घृण हत्या केली.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे एआय तंत्रज्ञानाचा गुन्हेगारी तपासात किती प्रभावी वापर होऊ शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. एका साध्या ऑम्लेटपासून सुरू झालेली ही तपासयात्रा अखेर एका थरारक हत्यारहस्याच्या उकलपर्यंत पोहोचली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number