Hair Found in Air India Food: एअर इंडियाच्या विमानातील जेवणात 2002 मध्ये ‘केस’ सापडल्याप्रकरणी 23 वर्षांनंतर अखेर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने एअर इंडियाला प्रवासी पी. सुंदरापरिप्पोरनम यांना 35 हजार भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय विमान प्रवाशांच्या हक्कांबाबत एक महत्त्वाचे उदाहरण ठरले आहे.
2002 मधील एअर इंडियाच्या विमानातील प्रसंग
26 जुलै 2002 रोजी सुंदरापरिप्पोरनम कोलंबोहून चेन्नईकडे जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट (IC 574) मध्ये प्रवास करत होत्या. उड्डाणादरम्यान त्यांना सीलबंद पॅकमध्ये जेवण देण्यात आलं. परंतु पॅक उघडल्यानंतर त्यात केसांचे तंतू आढळल्याने त्या संतप्त झाल्या आणि त्यांना उलट्या व अस्वस्थता जाणवू लागली. त्यांनी तात्काळ विमानात तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. चेन्नईला पोहोचल्यावर त्यांनी एअर इंडियाच्या उपमहाव्यवस्थापकांना लेखी तक्रार दाखल केली. एअर इंडियाने प्रत्युत्तरादाखल माफीनामा आणि चौकशीचे आश्वासन दिलं. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सुंदरापरिप्पोरनम यांनी 11 लाख रुपयांची भरपाई मागणी करत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
एअर इंडियाची बाजू आणि न्यायालयाचा निकाल
एअर इंडियाने न्यायालयात युक्तीवाद केला की, जेवण चेन्नईतील अॅम्बेसेडर पल्लव हॉटेलकडून पुरवण्यात आलं होतं, त्यामुळे दोष हॉटेलचा आहे. कंपनीचा दावा होता की, कदाचित प्रवाशाने पॅक उघडताना दुसऱ्या प्रवाशाचा केस आत पडला असावा. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने ही बाजू फेटाळली आणि स्पष्ट केलं की, एअर इंडिया स्वतःच कबूल करत आहे की अन्नात केस होते, म्हणजेच निष्काळजीपणा सिद्ध होतो. न्यायालयाने Res Ipsa Loquitur (म्हणजेच दोष स्पष्ट आहे ) या कायदेशीर तत्त्वाचा आधार घेतला आणि म्हटलं प्रवाशाने दोष कसा झाला हे सिद्ध करण्याची गरज नाही.
हेही वाचा - Defence Ministry: 79 हजार कोटींच्या लष्करी प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याने तिन्ही सशस्त्र दलांची ताकद वाढणार
दरम्यान, न्यायालयाने नमूद केलं की प्रवाशाने गंभीर आरोग्यहानीचे ठोस पुरावे सादर केले नाहीत, म्हणून पूर्वीच्या 1 लाख रुपयांच्या भरपाईऐवजी 35 हजार दंड योग्य आहे. तसेच, जेवण तिकीट किमतीत समाविष्ट असल्याने, जेवण पुरवणारा कोण आहे याची पर्वा न करता जबाबदारी एअर इंडियाचीच आहे, असं न्यायालयाकडून स्पष्ट नमूद करण्यात आलं. तथापी, एअर इंडियाला चार आठवड्यांत प्रवाशाला भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा - भ्रष्टाचारावर करडी नजर ठेवणारे लोकपाल आता 70 लाखाच्या महागड्या BMW कारमधून फिरणार
विमान कंपन्यांनी स्वच्छतेची जबाबदारी पाळावी
या निकालानंतर न्यायालयाने सांगितलं की, एअरलाइनचं कर्तव्य केवळ सुरक्षित प्रवास देणं नाही, तर प्रवाशांना स्वच्छ, दर्जेदार अन्न आणि पेय पुरवणं देखील त्याच जबाबदारीचा भाग आहे. या निर्णयामुळे भविष्यात विमान कंपन्यांनी फ्लाइटमध्ये पुरविल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावं लागेल.