Hardik Pandya Injury: हार्दिक पांड्याच्या दुखापतीने भारतीय संघ चिंतेत; ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकण्याची शक्यता

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Hardik Pandya Injury: हार्दिक पांड्याच्या दुखापतीने भारतीय संघ चिंतेत; ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकण्याची शक्यता

भारतीय क्रिकेट संघासाठी मोठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची दुखापत गंभीर असल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आशिया कप सुपर-फोर सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो अंतिम सामन्यातही खेळले नाही. त्याच्या जागी रिंकू सिंगला संघात संधी देण्यात आली होती.
 
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिकला डाव्या पायाच्या क्वॉड्रिसेप्समध्ये दुखापत झाली असून त्याला किमान चार आठवडे विश्रांती घ्यावी लागेल. 19 ऑक्टोबरपासून पर्थमध्ये एकदिवसीय मालिका सुरू होत असल्याने त्याचा सहभाग जवळपास अशक्य दिसतो. तो अपेक्षेपेक्षा लवकर सावरला तरी ODI मालिकेत परतण्याची शक्यता कमी असून कदाचित 29 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत तो दिसू शकतो.
 
हार्दिकची अनुपस्थिती ही भारतीय संघासाठी मोठी चिंता आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल असल्याने संघात समतोल राखण्यासाठी हार्दिकसारख्या अष्टपैलूवर मोठी जबाबदारी होती. त्याच्या पर्याय म्हणून नितीश रेड्डी आणि शिवम दुबे यांचा विचार करता येईल, मात्र अनुभव आणि दर्जाच्या बाबतीत हार्दिकच वरचढ ठरतो. शिवाय त्याचा ऑस्ट्रेलियातील खेळाचा अनुभव संघाला अधिक मदत करू शकला असता.
 
दरम्यान, या मालिकेत भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरागमन होणार आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोघांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा सराव सुरू केला असून ऑस्ट्रेलिया मालिकेत ODI संघासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील.
 
या मालिकेत रोहित-कोहलीच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. कारण पुढील 2027 च्या ODI विश्वचषकासाठी संघातील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना दमदार कामगिरी करणे आवश्यक आहे. त्यामुळे एकीकडे हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे चिंता वाढली असली तरी दुसरीकडे दोन दिग्गजांच्या पुनरागमनाने भारतीय संघाला बळ मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number