Ebola Case In India: जगभरात वेगाने पसरणाऱ्या घातक इबोला विषाणूने आता भारताची चिंता वाढवली आहे. युगांडाहून राजस्थानच्या जयपूरमध्ये पोहोचलेल्या एका परदेशी महिला प्रवाशामध्ये इबोलाची संशयास्पद लक्षणे आढळून आली आहेत. या धक्कादायक माहितीनंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा तातडीने हायअलर्टवर आली असून, प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालाची वाट न पाहता प्रशासनाने युद्धपातळीवर खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.
विमानतळावरील थर्मल स्क्रीनिंगमध्ये संशय
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला शारजाहहून विमानाने जयपूर विमानतळावर उतरली होती. विमानतळावर सुरू असलेल्या नियमित वैद्यकीय तपासणी आणि स्क्रीनिंगदरम्यान डॉक्टरांना तिच्या शरीरात इबोला विषाणूशी साम्य असणारी लक्षणे आढळली. यानंतर तिला तातडीने जयपूर येथील राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (RUHS) रुग्णालयात हलवून अत्यंत कडक विलगीकरणात (Isolation) ठेवण्यात आले आहे.
नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत रवाना; अहवालाची प्रतीक्षा
आरयूएचएस रुग्णालयाचे अधीक्षक अनिल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला इबोला संसर्ग झाल्याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. संसर्गाचे अचूक निदान करण्यासाठी तिच्या शरीरातील द्रव आणि रक्ताचे नमुने पुण्याच्या विशेष प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हा अंतिम वैद्यकीय अहवाल आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत मिळण्याची शक्यता असून, त्यानंतरच पुढील दिशा स्पष्ट होईल.
हैदराबादमध्येही सुदानमधील नागरिक संशयित
केवळ जयपूरच नाही तर हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरही (RGIA) अशीच एक घटना समोर आली आहे. तेथे आलेल्या एका सुदानी नागरिकाला तीव्र ताप असल्याचे आढळल्याने त्याला सिकंदराबादच्या गांधी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याचे नमुने सीसीएमबी (CCMB) कडे तपासणीसाठी पाठवले आहेत. या वाढत्या धोक्यामुळे केंद्र सरकारने भारतीय नागरिकांना काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये अत्यंत आवश्यक असल्याशिवाय प्रवास न करण्याचा कडक सल्ला दिला आहे.
जागतिक स्तरावर 'आरोग्य आणीबाणी' घोषित
काँगो आणि युगांडामध्ये इबोला विषाणूच्या 'बुंदीबुग्यो स्ट्रेन' (Bundibugyo Strain) चा प्रादुर्भाव अनियंत्रित झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) International Health Regulations (IHR) 2005 अंतर्गत 17 मे 2026 रोजी या परिस्थितीला 'आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' (PHEIC) म्हणून घोषित केले आहे. आफ्रिका सीडीसीने (Africa CDC) देखील याला खंडीय सुरक्षेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी मानले आहे. इबोलाचा हा प्रकार अत्यंत जीवघेणा असून, त्याचा मृत्यूदर खूप जास्त आहे. विशेष म्हणजे या 'बुंदीबुग्यो स्ट्रेन'वर अद्याप कोणतीही लस किंवा विशिष्ट औषध उपलब्ध नाही. सुदैवाने, आतापर्यंत भारतात याचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
संकटाच्या काळात भारताचा युगांडाला मदतीचा हात; वायुसेनेचे विमान रवाना
आफ्रिकन युनियन कमिशन आणि आफ्रिका सीडीसीच्या विनंतीला मान देऊन भारताने युगांडाला इबोलाशी लढण्यासाठी मोठी वैद्यकीय मदत पाठवली आहे. भारतीय हवाई दलाच्या 'सी-17 ग्लोबमास्टर III' (C-17 Globemaster III) या महाकाय विमानाने 26 जून रोजी नवी दिल्लीहून अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा केला.
परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) माहितीनुसार, भारताने 24 मे रोजी पाठवलेल्या 2.5 टन वजनाच्या पहिल्या हप्त्यानंतर, आता तब्बल 43 टन वजनाचा दुसरा मोठा साहित्याचा हप्ता 2 जून 2026 रोजी युगांडाची राजधानी कम्पाला येथे यशस्वीरित्या पोहोचवला आहे. या मदतीमध्ये अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे (PPE Kits), वैद्यकीय देखरेख यंत्रे, नमुना वाहतूक किट्स, संसर्ग प्रतिबंधक औषधे आणि पूरक आहाराचा समावेश आहे. भारत सध्या आफ्रिकन आरोग्य अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून गरज पडल्यास पुढील लॉजिस्टिक मदत देण्यासही सज्ज आहे.