Friday, March 13, 2026 11:24:37 PM

Students Killed In Accident: महामार्ग रक्ताळला; भरधाव कारने आधी दुचाकीला उडवलं, मग कंटेनरला धडकली; सात तरुणांचा करुण अंत

XUV 700 च्या अतिवेगामुळे नियंत्रण सुटून कारने दुचाकी आणि कंटेनरला धडक दिली. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.

students killed in accident महामार्ग रक्ताळला भरधाव कारने आधी दुचाकीला उडवलं मग कंटेनरला धडकली सात तरुणांचा करुण अंत

बंगळुरू: जीवनाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होण्यापूर्वीच एका भीषण वळणावर तो कायमचा थांबला. परीक्षेचा आणि अभ्यासाचा ताण हलका करण्यासाठी 'लाँग ड्राईव्ह'ला गेलेल्या बारावीच्या सहा मित्रांवर काळाने अशी काही झडप घातली की, क्षणार्धात सहा हसते-खेळते संसार उद्ध्वस्त झाले. बंगळुरूमधील होस्कोट-दबासपेटे राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या या थरारक तिहेरी अपघातात सहा विद्यार्थ्यांसह एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. रक्ताने माखलेल्या महामार्गावर रात्री 'मृत्यूचं तांडव' पाहायला मिळालं, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एम. सत्यवारा गावाजवळ हा हृदयद्रावक अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या एका XUV 700 कारने (KA 03 NW 0138) प्रथम समोरून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की, कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती थेट दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला गेली. अनियंत्रित झालेली ही कार समोरून येणाऱ्या एका कंटेनरला जाऊन धडकली. या भीषण टकरीत आणखी एका कारचेही नुकसान झाले. एका क्षणाच्या चुकीने महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आणि वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.

हेही वाचा: Devendra Fadnavis: फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्यांचा 'सस्पेन्स'; एकाच आठवड्यात दोनदा राजधानीत, नक्की शिजतंय तरी काय?

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सहाही तरुण बारावीचे विद्यार्थी होते. अश्विन नायर, अरहान शरीफ, अयान अली, भरत, एथन जॉर्ज आणि फरहान अशी या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबतच, काम आटोपून घराकडे परतणाऱ्या गगन नावाच्या दुचाकीस्वाराचाही या अपघातात अंत झाला. ज्या वयात स्वप्नांना पंख फुटतात आणि भविष्य घडवण्याची जिद्द असते, त्याच वयात या उमलत्या कळ्या नियतीच्या क्रूर खेळामुळे कायमच्या कोमेजल्या गेल्या.

अभ्यासाचा डोंगर आणि आगामी परीक्षांची चिंता, यातून थोडी विश्रांती मिळावी आणि मन मोकळं व्हावं म्हणून हे सहा मित्र शुक्रवारी रात्री घराबाहेर पडले होते. मैत्रीच्या गप्पा आणि आनंदासाठी निवडलेली ही सफर त्यांची 'अंतिम यात्रा' ठरेल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, कारमधील एअरबॅग्ज उघडूनही या मुलांचे प्राण वाचू शकले नाहीत. 'अतिवेग अन् मृत्यूला आमंत्रण' याचा प्रत्यय पुन्हा एकदा या निमित्ताने आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत सर्व संपले होते. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कारचा अतिवेग हेच या अपघाताचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे. एका बाजूला मुलांच्या भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या पालकांचा आक्रोश आणि दुसरीकडे महामार्गावर पडलेला वाहनांचा ढिगारा पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. रस्ते सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणे किती महाग पडू शकते, याची भीषण जाणीव या अपघाताने करून दिली आहे.

हेही वाचा: US Russia Trade Deal: रशियाचा यूटर्न? ड्रॅगनच्या ‘डी-डॉलरायझेशन’ मोहिमेला मोठा धक्का? भारतावर काय परिणाम होणार?


सम्बन्धित सामग्री