Himalaya: हिमालयाचा प्रदेश जगातील सर्वाधिक संवेदनशील हवामान क्षेत्रांपैकी एक मानला जातो. येथील बर्फाच्छादित पर्वतरांगा, वितळणाऱ्या हिमनद्या आणि त्यातून तयार होणारे हिमतलाव (Glacial Lakes) हे केवळ सौंदर्याचं प्रतीक नाहीत, तर पर्यावरणीय संतुलनाचं आरसंसुद्धा आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून या संतुलनात चिंताजनक बदल दिसून येत आहेत.
केंद्रीय जल आयोगाच्या (CWC) ताज्या निरीक्षणानुसार, गेल्या 14 वर्षांत हिमालयीन प्रदेशातील हिमतलाव आणि जलाशयांचं क्षेत्र तब्बल 9.24 टक्क्यांनी वाढलं आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे केवळ भारतातील हिमतलावांचं क्षेत्र तब्बल 22.56 टक्क्यांनी वाढलं आहे. या आकडेवारीतून हवामानबदलाचे थेट परिणाम स्पष्ट दिसत असून, तज्ज्ञांनी ही बाब गंभीरपणे घेण्याचा सल्ला दिला आहे.
2011 साली हिमालयीन प्रदेशातील हिमतलावांचं एकूण क्षेत्र सुमारे 5.30 लाख हेक्टर होतं, जे आता 5.79 लाख हेक्टरपर्यंत वाढलं आहे. ही वाढ दिसायला अल्प वाटली तरी, तिचा अर्थ मोठ्या प्रमाणावर बर्फ वितळत आहे आणि त्यामुळे नवीन तलाव तयार होत आहेत. हिमनद्या मागे सरकत असल्याने (Glacier Retreat) या नव्या तलावांची निर्मिती होत आहे, आणि हेच भविष्यातील मोठ्या नैसर्गिक आपत्तींचं संकेतक ठरू शकतं.
जल आयोगाने सेंटिनेल उपग्रह आणि ‘गूगल अर्थ इंजिन’च्या माध्यमातून हिमालयातील सुमारे 2,843 हिमतलावांचे निरीक्षण केले. त्यात एकूण 1,435 तलावांमध्ये जलक्षेत्र वाढल्याचं तर 1,008 तलावांमध्ये घट झाल्याचं आढळलं. म्हणजेच जवळपास निम्म्या तलावांनी आपलं क्षेत्रफळ वाढवलं आहे. जे बर्फ वितळण्याच्या वाढत्या प्रमाणाकडे थेट बोट दाखवतं.
या वाढत्या तलावांमुळे सर्वांत मोठा धोका आहे तो ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड (GLOF) म्हणजेच हिमतलाव फुटून अचानक येणाऱ्या पुरांचा. अनेक वेळा हे तलाव दगड, माती किंवा बर्फाच्या अस्थिर भिंतींनी तोलून धरलेले असतात. वितळत्या बर्फामुळे दाब वाढल्यास ही भिंत कोसळते आणि काही मिनिटांतच प्रचंड प्रमाणावर पाणी खालच्या भागात कोसळतं. अशा पुरामुळे गावं, पूल, रस्ते आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं.
लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भागांमध्ये सर्वाधिक हिमतलाव विस्तारत आहेत. फक्त अरुणाचल प्रदेशातच सुमारे 180 पेक्षा जास्त तलावांचं क्षेत्र वाढलेलं दिसतं, तर लडाखमध्ये ही संख्या 133 आहे.
तज्ज्ञांच्या मते, सध्या उपलब्ध तंत्रज्ञानाद्वारे हिमतलाव फुटण्याचा अचूक अंदाज वर्तवणे शक्य नाही. त्यामुळे सातत्याने उपग्रह निरीक्षण आणि भू-सर्वेक्षणाद्वारे डेटा गोळा करणे अत्यावश्यक आहे. हवामानबदलामुळे येणाऱ्या आपत्तींची पूर्वतयारी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी अधिक सक्रिय भूमिका घेणे गरजेचं असल्याचं जल आयोगाच्या ताज्या अहवालात नमूद आहे.
हिमालयातील या वाढत्या हिमतलावांची कहाणी ही केवळ वैज्ञानिक आकडेवारी नाही, तर ती निसर्गाच्या धोक्याचा इशारा आहे आणि तो काळजीपूर्वक ऐकण्याची हीच योग्य वेळ आहे.