Friday, June 12, 2026 10:53:54 PM

Assam CM New: हिमंत बिस्वा सरमा होणार आसामचे मुख्यमंत्री; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय; 'या' दिवशी घेणार शपथ

भाजपचे ज्येष्ठ नेते जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री पदासाठी हिमंता बिस्वा सरमा यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

assam cm new हिमंत बिस्वा सरमा होणार आसामचे मुख्यमंत्री भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय या दिवशी घेणार शपथ

Assam CM New: आसामच्या राजकारणातील प्रभावी नेते हिमंत बिस्वा सरमा यांची सलग दोन वेळा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री पदासाठी हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. या निवडीमुळे सरमा यांच्या नेतृत्वावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दर्शवला असून, ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळणार आहेत. 6 मे रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, तेव्हापासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते.

12 मे रोजी भव्य शपथविधी सोहळा
हिमंत बिस्वा सरमा यांचा शपथविधी सोहळा 12 मे रोजी सकाळी 11:00 वाजता पार पडणार आहे. हा सोहळा गुवाहाटी येथील खानापारा व्हेटर्नरी कॉलेजच्या मैदानावर आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, या सोहळ्यासाठी देशभरातील सुमारे 22 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण धाडण्यात आले असून, हा कार्यक्रम भाजपच्या शक्तीप्रदर्शनाचे केंद्र ठरणार आहे.

निरीक्षकांच्या उपस्थितीत झाली निवड
विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी भाजपने केंद्रीय स्तरावरून 2 निरीक्षकांची नियुक्ती केली होती. यामध्ये माजी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांचा समावेश होता. त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सर्व आमदारांनी हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावावर संमती दर्शवली. 2016 मध्ये आसाममध्ये प्रथमच भाजपची सत्ता आली तेव्हा सर्बानंद सोनोवाल यांनी नेतृत्व केले होते, मात्र 2021 पासून सरमा यांनी प्रशासनावर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.

हेही वाचा - CM Joseph Vijay Cabinet Tamilnadu: तामिळनाडू राजकारणाचा चेहरामोहरा बदलणार! जोसेफ विजय यांच्या मंत्रिमंडळात डिजीटल कंटेट क्रिएटर ते डेंटिस्ट...; जाणून घ्या कोणाची नावं समाविष्ट

निवडणुकीत एनडीएची 'दणदणीत' सरशी
4 मे रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपप्रणीत एनडीए आघाडीने विरोधकांचा सुपडा साफ करत प्रचंड बहुमत मिळवले आहे. 126 जागांच्या विधानसभेत भाजपने स्वबळावर 82 जागा जिंकून सत्ता राखली आहे. दुसरीकडे, काँग्रेसला केवळ 19 जागांवर समाधान मानावे लागले, तर बीपीएफ आणि एजीपीने प्रत्येकी 10 जागा मिळवल्या आहेत. एआययूडीएफला केवळ 2 जागा मिळाल्या असून, या निकालांनी हिमंता बिस्वा सरमा यांच्या लोकप्रियतेवर पुन्हा एकदा मोहोर उमटवली आहे.
 


सम्बन्धित सामग्री