Sikkim Landslide: सिक्कीममध्ये निसर्गाचे तांडव; मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन, 20 हून अधिक घरे अन् सरकारी निवासस्थाने गेली वाहून

ग्यालशिंग जिल्ह्यातील रिम्बी परिसरात गुरुवारी रात्री अचानक उद्भवलेल्या भीषण भूस्खलनामुळे 20 पेक्षा जास्त घरे आणि शासकीय कर्मचारी निवासस्थाने वाहून गेली.
Sikkim Landslide
सिक्कीममध्ये भूस्खलन, 20 हून अधिक घरे गेली वाहून

Sikkim Landslide: ईशान्येकडील सिक्कीम राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निसर्गाचे भीषण तांडव पाहायला मिळाले आहे. ग्यालशिंग जिल्ह्यातील रिम्बी परिसरात गुरुवारी रात्री अचानक उद्भवलेल्या भीषण भूस्खलनामुळे 20 पेक्षा जास्त घरे आणि शासकीय कर्मचारी निवासस्थाने वाहून गेली. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. दुसरीकडे, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अर्णब’ चक्रीवादळ काहीसे कमकुवत झाले असले तरी त्यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासह 9 राज्यांमध्ये आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशामध्ये पूर आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्याने आतापर्यंत 8,082 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा

देशाच्या मध्य आणि उत्तरेकडील भागात मान्सूनचा प्रभाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. मध्य प्रदेशात निर्माण झालेल्या तीव्र हवामान प्रणालीमुळे जबलपूरसह 13 जिल्ह्यांत अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट तर 16 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातही मान्सूनने पुन्हा जोर धरला असून लखनौ, कानपूर, वाराणसी आणि प्रयागराजसह 20 शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. याव्यतिरिक्त बिहारमधील 19 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून छत्तीसगड आणि किनारपट्टीच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा –  Sonam Wangchuk: ‘माझा एन्काउंटर..’; सोनम वांगचुक यांचा धक्कादायक दावा, गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी आणि भूस्खलनाचे सत्र

उत्तराखंडमध्ये पावसासोबतच उच्च पर्वतीय भागात बर्फवृष्टी सुरू झाल्याने पर्यटकांचे हाल होत आहेत. चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ-सतोपंथ मार्गावरील चक्रतीर्थ परिसरात झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे परिसर पांढऱ्या शुभ्र चादरीने झाकला गेला आहे. कर्णप्रयाग-गैरसैन महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली. हरिद्वारमधील ‘हर की पौरी’ परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची पळापळ झाली. हवामान विभागाने येत्या 2 दिवसांत नैनिताल, चंपावत, पौरी आणि पिथोरगड परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version