Thursday, November 13, 2025 01:24:50 PM

Indian Women's Cricket Team: भारताचा पहिला महिला वर्ल्ड कप विजय! पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

ICC महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. पंतप्रधान मोदींनी संघाचं कौतुक केलं.

indian womens cricket team भारताचा पहिला महिला वर्ल्ड कप विजय पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 फायनलमध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयाचे कौतुक करत महिला संघाचं अभिनंदन केलं. पंतप्रधान मोदींनी या विजयानं भारताच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिला असल्याचं सांगितलं आणि या खेळाडूंच्या जिद्दी, कौशल्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण कामगिरीचं विशेष कौतुक केलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पंतप्रधान मोदींनी लिहिलं “ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 फायनलमध्ये भारतीय संघाचा अप्रतिम विजय! अंतिम सामन्यातील त्यांचा खेळ कौशल्य आणि आत्मविश्वासानं भरलेला होता. हा ऐतिहासिक विजय भविष्यातील खेळाडूंना प्रेरणा देईल.”

भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी मात रविवारी नवी मुंबईत झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला. भारतानं दिलेल्या 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ 45.3 षटकांत 246 धावांवर ऑलआउट झाला. या विजयात दीप्ती शर्माच्या पाच विकेट्सच्या झळकदार कामगिरीनं निर्णायक भूमिका बजावली. शेफाली वर्मा ठरली सामन्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू भारताकडून शेफाली वर्मा हिनं केवळ 78 चेंडूंवर 87 धावा केल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. तिच्या ऑलराऊंड कामगिरीमुळे तिला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. शेफालीच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताला मजबूत धावसंख्या उभारता आली.

जयशंकर आणि योगी आदित्यनाथ यांचंही संघाला अभिनंदन विदेश मंत्री एस. जयशंकर यांनीही भारतीय महिला संघाचं कौतुक करत त्यांना “विश्वविजेते” म्हणून गौरवलं. त्यांनी आपल्या X पोस्टमध्ये लिहिलं “महिला क्रिकेट संघाच्या या अफलातून विजयासाठी मनःपूर्वक अभिनंदन. हा भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण आहे.” उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील महिला संघाच्या या विजयाला “ऐतिहासिक” म्हणत देशवासीयांचं अभिनंदन केलं. त्यांनी लिहिलं “ऐतिहासिक विजय! भारतीय महिला क्रिकेट संघाला मनःपूर्वक शुभेच्छा! तुम्ही देशाचा अभिमान वाढवलात. भारत माता की जय!”

चौथं विश्वविजेतेपद जिंकणारा भारताचा महिला संघ या विजयासह भारत महिला वर्ल्ड कप विजेता ठरलेला चौथा देश ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या देशांनी विजेतेपद पटकावलं होतं. भारताच्या या विजयामुळे केवळ क्रिकेटच नव्हे, तर भारतीय महिला खेळाडूंना जागतिक स्तरावर अभिमानाचं स्थान मिळालं आहे.

हेही वाचा: India Win World Cup 2025 : हरमनप्रीतच्या winning कॅचनं भारताचं स्वप्न साकार, महिला क्रिकेट संघानं कोरलं वर्ल्ड कप 2025 वर नाव


सम्बन्धित सामग्री