भारतातील पहिले स्वदेशी पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर जेट्स बनवण्याच्या अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) प्रकल्पाला गती मिळत आहे. आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडे विमाननिर्मितीचं वर्चस्व होतं. मात्र आता खासगी कंपन्याही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात उतरल्या आहेत. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स, कल्याणी ग्रुप, लार्सन अँड टुब्रो आणि अदानी यांसारख्या कंपन्या लवकरच बोली लावणार आहेत.
सरकारने मे महिन्यातच स्पष्ट केले होते की कोणतीही भारतीय कंपनी स्वतंत्रपणे, जॉइंट व्हेंचर स्वरूपात किंवा कन्सोर्टियम म्हणून या प्रकल्पात सहभागी होऊ शकते. 30 सप्टेंबर हा प्रोटोटाइप डेव्हलपमेंट आणि उत्पादनासाठीच्या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) सादर करण्याचा अंतिम दिवस असल्याने स्पर्धा चांगलीच तीव्र झाली आहे.
AMCA हे 5.5 पिढीचं स्वदेशी लढाऊ विमान असेल. यात जुळी इंजिनं, मध्यम वजन, आधुनिक एव्हिऑनिक्स, सुपर-क्रूझ क्षमता, अंतर्गत शस्त्रबंकर आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम असणार आहेत. या प्रकल्पाचं नेतृत्व एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) करत असून DRDO चं सहकार्य आहे. सुमारे 15,000 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात पाच प्रोटोटाइप तयार करण्याची योजना आहे. पहिलं विमान 2027 पर्यंत तयार होईल, तर भारतीय वायुसेनेत (IAF) 2035 पर्यंत AMCA दाखल होणार आहेत.
वायुसेनेची सध्याची स्थिती मात्र चिंताजनक आहे. जुन्या MiG विमानांच्या सेवानिवृत्तीनंतर सध्या फक्त 30 स्क्वॉड्रन शिल्लक आहेत, जे मंजूर 42.5 स्क्वॉड्रनपेक्षा खूपच कमी आहे. पुढील दशकात मिराज-2000 आणि जॅग्वारसह आणखी 8 स्क्वॉड्रन निवृत्त होणार आहेत. त्यामुळे IAF ला किमान सात स्क्वॉड्रन म्हणजेच 126 AMCA विमानं तातडीने आवश्यक आहेत. याशिवाय तेजस MK1A, MK2 आणि रशियन Su-30MKI ही विमानेही वायुसेनेत असतील.
दरम्यान, चीनकडे आधीच 1,600 आधुनिक लढाऊ विमाने आहेत, ज्यात जवळपास 195 J-20 पाचव्या पिढीची स्टेल्थ फायटर आहेत. पाकिस्तानने चीनसोबत JF-17 विकसित केले असून त्यांनी 20 J-10CE विकत घेतले आहेत. तसेच चीनकडून 40 पाचव्या पिढीतील J-35A घेण्याची चर्चा सुरू आहे.
भारतातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे विमानांचा इंजिन विकास. पहिल्या दोन AMCA स्क्वॉड्रनमध्ये GE-F414 इंजिन वापरण्याची योजना आहे, तर नंतरच्या टप्प्यात फ्रान्सची Safran, अमेरिकेची GE आणि ब्रिटनची Rolls-Royce यांच्यासोबत सहकार्य करून स्वदेशी इंजिन तयार करण्याची योजना आहे. कल्याणी ग्रुपच्या भारत फोर्जने BEML आणि Data Patterns यांच्यासोबत कन्सोर्टियम तयार करून आपली EoI दाखल केली आहे. या भागीदारीत भारत फोर्जचा 50%, BEML चा 30% आणि Data Patterns चा 20% हिस्सा असेल.