आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात सर्वच क्षेत्रांत तेजी दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय निर्णयामुळे देशांतर्गत शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली आहे. सोमवारी व्यवहार सुरू होताच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) सेन्सेक्स जवळपास 1200 अंकांनी वधारला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टीही मागे राहिला नाही; निफ्टीमध्ये सुमारे 1.53 टक्के (किंवा 361 अंकांची) दमदार वाढ होऊन त्याने 23,950 चा टप्पा ओलांडला.
मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा सेन्सेक्स ओपनिंगलाच 76 हजारच्या पुढे गेला आहे. बाजार उघडताच 1100 अंकांपेक्षा जास्त उसळी पहायला मिळाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी इंडेक्सने सुद्धा सेन्सेक्सच्या पावलावर पाऊल टाकलं. 330 अंकांपेक्षा जास्त ओपनिंग मिळाली.
भारतीय शेअर बाजारातील ऐतिहासिक तेजीमागे रविवारी समोर आलेली एक महत्त्वाची जागतिक घडामोड कारणीभूत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली की, इराणसोबतचा शांतता करार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सुरक्षिततेची नवी भावना निर्माण झाली आहे. दीर्घकाळापासून चाललेल्या भू-राजकीय तणावाचा संभाव्य अंत होणार असल्याच्या वृत्तामुळे जगभरातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
या शेअर्समध्ये तेजी
आजच्या व्यवहारांत श्रीराम फायनान्स, इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो), बजाज फायनान्स, एल अँड टी (L&T) आणि टीएमपीव्ही (TMPV) हे सर्वाधिक वाढ नोंदवणारे (टॉप गेनर्स) प्रमुख शेअर्स ठरले आहेत. दुसरीकडे, बाजारातील तेजी असूनही ओएनजीसी (ONGC), सिप्ला (Cipla) आणि अपोलो हॉस्पिटल्स (Apollo Hospitals) यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मात्र घसरण दिसून येत आहे.