India Iran Aid: इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून इराणला मदतीची पहिली खेप रवाना केली आहे. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय साहित्याचा समावेश असलेली ही खेप इराणमध्ये दाखल झाली असून, तेहरानमधील भारतीय दूतावासाने याला दुजोरा दिला आहे. 'इराणी रेड क्रेसेंट सोसायटी'ने ही मदत स्वीकारली असून, युद्धाच्या या कठीण काळात भारताने दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल इराणने भारतीय जनतेचे आभार मानले आहेत. कोणत्याही जागतिक संकटात मदतीसाठी तत्पर राहण्याची आपली परंपरा भारताने या निमित्ताने पुन्हा एकदा जपली आहे.
इराणकडून हृदयस्पर्शी प्रतिसाद; सोशल मीडियावर मानले आभार
भारताकडून मिळालेल्या या मदतीनंतर भारतातील इराणी दूतावासाने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. "भारताच्या सन्माननीय आणि दयाळू जनतेकडून आलेली वैद्यकीय मदतीची पहिली खेप आम्हाला प्राप्त झाली आहे. या मदतीबद्दल आम्ही भारतीय बांधवांचे मनापासून ऋणी आहोत," अशा शब्दांत इराणने आपली कृतज्ञता व्यक्त केली. 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या हवाई हल्ल्यांमुळे इराणमधील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला असताना, भारताची ही मदत अत्यंत कळीची ठरणार आहे.
युद्धामुळे इराणमध्ये 1300 नागरिकांचा मृत्यू
जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत अली बहरेनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संघर्ष सुरू झाल्यापासून इराणमध्ये आतापर्यंत 1,300 हून अधिक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे, तर 7,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नोंदवलेल्या अहवालानुसार, इराणमधील आरोग्य सुविधांवर आतापर्यंत 18 वेळा हल्ले झाले असून, त्यामध्ये आठ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. एवढी भीषण परिस्थिती असतानाही इराणची प्राथमिक आरोग्य सेवा प्रणाली अजूनही कार्यरत असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – Iran-USA War: 'दहशतवादी इराणी राजवटीचे अवशेष नष्ट करणार…'; डोनाल्ड ट्रम्प यांचा कडक इशारा
'काळा पाऊस' आणि आरोग्याचा धोका
युद्धामुळे इराणमधील तेल प्रकल्पांना आग लागल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात धूर आणि काजळी पसरली आहे, ज्याला तज्ज्ञांनी काळा पाऊस असे संबोधले आहे. यामुळे श्वसनसंस्थेशी संबंधित आजारांचा धोका वाढला असून जागतिक आरोग्य संघटनेने यावर चिंता व्यक्त केली आहे. WHO च्या प्रादेशिक संचालक हनान बाल्खी यांनी सांगितले की, परिस्थिती बिघडल्यास आपत्कालीन साहित्य पुरवण्यासाठी आमची 'कन्टिंगन्सी प्लॅन' तयार आहे. दुबईतील केंद्रावरून स्थगित केलेली वैद्यकीय विमाने आता पुन्हा सुरू झाली असून, लवकरच आणखी मदत पोहोचवली जाणार आहे.