इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होत असताना, भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून भारतीय ध्वज असलेले ‘ग्रीन सान्वी’ हे एलपीजी वहन करणारे जहाज सुरक्षितपणे पार झाले असून ते आता मुंबईकडे मार्गस्थ झाले आहे. 6 एप्रिल 2026 पर्यंत हे जहाज मुंबईत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘ग्रीन सान्वी’ या जहाजावर सुमारे 44,000 मेट्रिक टन एलपीजी साठा आहे. जहाज ट्रॅकिंग माहितीनुसार, हे टँकर फारसच्या आखातातून प्रवास करत इराणच्या नियंत्रणाखालील सागरी मार्गाने सुरक्षित कॉरिडॉरचा वापर करून होर्मुज सामुद्रधुनी पार करण्यात यशस्वी ठरले. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीत हा पुरवठा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
विशेष म्हणजे, मार्च महिन्यात होर्मुज सामुद्रधुनी पार करणारे हे सातवे भारतीय जहाज ठरले आहे आणि आतापर्यंत पार झालेली सर्व जहाजे एलपीजी वाहतूक करणारीच होती. यामुळे भारताच्या ऊर्जा गरजांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या एका जहाजावरील एलपीजी साठा देशाच्या साधारण अर्ध्या दिवसाच्या गरजेसाठी पुरेसा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, अजूनही भारताचे अनेक तेल व वायू वाहून नेणारे जहाजे फारसच्या आखातात अडकून पडले असून ते इराणी अधिकाऱ्यांच्या परवानगीची वाट पाहत आहेत. ‘ग्रीन आशा’ आणि ‘जग विक्रम’ ही आणखी दोन भारतीय जहाजे लवकरच होर्मुज पार करून भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत सरकार सध्या इराणसोबत राजनैतिक स्तरावर सातत्याने संवाद साधत आहे, जेणेकरून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा. इराणने काही अटींसह होर्मुज मार्ग खुला ठेवला असून भारतासारख्या मैत्रीपूर्ण देशांना विशेष सवलत दिली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले आहे की, भारतासह चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान या देशांच्या जहाजांना समन्वयातून मार्ग दिला जात आहे.
होर्मुज सामुद्रधुनी हा जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग मानला जातो, जो फारसच्या आखाताला अरबी समुद्राशी जोडतो. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल देखील सतर्क असून भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती मदत पुरवत आहे. अलीकडेच ‘जग वसंत’ आणि ‘पाइन गॅस’ या जहाजांनी अनुक्रमे कांडला आणि न्यू मंगळूर येथे मोठ्या प्रमाणावर एलपीजीचा पुरवठा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत भारतासाठी ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवणे हे मोठे आव्हान आहे. मात्र, अशा परिस्थितीतही भारतीय जहाजांची सुरक्षित वाहतूक सुरू असल्याने देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत.