Most Powerful Militaries: जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांच्या ताज्या क्रमवारीत भारताने आपले चौथे स्थान भक्कम केले आहे. मात्र, दुसरीकडे भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' या प्रत्युत्तरात्मक कारवाईनंतर पाकिस्तानच्या लष्करी रँकिंगमध्ये मोठी घसरण झाली असून, तो आता पहिल्या 10 देशांच्या यादीतून बाहेर फेकला गेला आहे. 'ग्लोबल फायरपॉवर मिलिटरी इंडेक्स 2026' च्या अहवालातून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
महासत्तांचा वरचष्मा: अमेरिका अव्वल, भारत चौथ्या स्थानी
जागतिक लष्करी क्रमवारीत अमेरिकेने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या तणावानंतरही रशिया दुसऱ्या, तर चीन तिसऱ्या क्रमांकावर स्थिर आहे. भारताने आपले चौथे स्थान टिकवून ठेवले असून, दक्षिण कोरिया पाचव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, फ्रान्सने मोठी प्रगती करत सहावे स्थान गाठले आहे, तर जपान सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. युनायटेड किंगडमची मात्र आठव्या स्थानावर घसरण झाली आहे.
'ऑपरेशन सिंदूर'चा पाकिस्तानला मोठा फटका
पाकिस्तानची लष्करी ताकद सातत्याने ढासळत असल्याचे अहवालात दिसत आहे. 2024 मध्ये 9 व्या स्थानावर असलेला पाकिस्तान 2025 मध्ये 12 व्या आणि आता 2026 मध्ये थेट 14 व्या स्थानावर घसरला आहे. या घसरणीमागे 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान झालेले नुकसान हे प्रमुख कारण मानले जात आहे. या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तानचे 11 हवाई तळ आणि 6 रडार यंत्रणा उद्ध्वस्त केल्या होत्या, ज्याचा मोठा परिणाम पाकिस्तानच्या 'पॉवर इंडेक्स' स्कोअरवर झाला आहे.
हेही वाचा - India EU Trade Deal: ‘युरोप स्वतःच्याच धोरणांना…’; भारत-युरोप संबंधांवर अमेरिका नाराज, 2007 पासून अडकलेला करार अखेर पूर्ण?
जर्मनीची मोठी झेप; लष्करी आधुनिकीकरणावर भर
या यादीत जर्मनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 2024 मध्ये 19 व्या स्थानावर असलेल्या जर्मनीने थेट 12 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. युरोपातील बदलत्या संरक्षण समीकरणामुळे जर्मनीने आपल्या लष्करी क्षमतेत आणि तंत्रज्ञानात केलेली गुंतवणूक या प्रगतीचे मुख्य कारण ठरली आहे. इटलीने आपले 10 वे स्थान टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे.
'ऑपरेशन सिंदूर'चा इतिहास
दहशतवाद्यांच्या तळांवरील भारतीय कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानला महागात पडला होता. भारताने पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांवर केलेल्या तीव्र हल्ल्यांनंतर पाकिस्तानने बचावात्मक पवित्रा घेत युद्धबंदीची विनंती केली होती. या लष्करी हानीमुळेच पाकिस्तानची जागतिक लष्करी प्रतिमा मलीन झाली असून त्यांची रँकिंग घसरत आहे.