Monday, December 08, 2025 07:43:02 AM

Hajj Agreement 2026: जेद्दाहमध्ये भारत - सौदी हज करारावर स्वाक्षरी; 1.75 लाख भारतीय यात्रेकरूंना परवानगी

दोन्ही देशांनी यात्रेकरूंना सुरक्षित, सुलभ आणि आध्यात्मिक अनुभव देण्याच्या बांधिलकीचा निश्चय केला आहे.

hajj agreement 2026 जेद्दाहमध्ये भारत - सौदी हज करारावर स्वाक्षरी 175 लाख भारतीय यात्रेकरूंना परवानगी

नवी दिल्ली: भारत आणि सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसंदर्भातील द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या करारानुसार 2026 साली 1,75,025 भारतीय यात्रेकरूंना हज यात्रा करण्यास परवानगी मिळेल. हा करार भारताचे अल्पसंख्याक कार्य आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि सौदी अरेबियाचे हज व उमराह मंत्री डॉ. तौफीक बिन फवजान अल-रबिया यांच्यात जेद्दाह येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान झाला. रिजिजू यांनी 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान सौदी अरेबियाचा अधिकृत दौरा केला.

या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी 2026 च्या हज यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला आणि यात्रेकरूंना अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवास अनुभव मिळावा यासाठी वाहतूक, निवास व्यवस्था आणि आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर दिला. किरन रिजिजू यांनी एक्सवर लिहिले, “भारत - सौदी अरेबिया संबंधांना अधिक बळकटी देणारा महत्त्वाचा टप्पा. डॉ. तौफीक बिन फवजान अल-रबिया यांच्यासोबत हज करारावर स्वाक्षरी केली. या कराराद्वारे 2026 साठी भारतीय यात्रेकरूंना 1,75,025 जागा निश्चित झाल्या आहेत. दोन्ही देशांनी यात्रेकरूंना सुरक्षित, सुलभ आणि आध्यात्मिक अनुभव देण्याच्या बांधिलकीचा निश्चय केला आहे.”

हेही वाचा: Tirupati Laddu Ghee Scam: तिरुपती मंदिराला लाडूसाठी 250 कोटींचं बनावट तूप पुरवलं; CBIचा धक्कादायक अहवाल

या बैठकीत यात्रेकरूंसाठी वाहतुकीची सुलभता, निवास, वैद्यकीय सुविधा आणि अन्नपुरवठा यासारख्या बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांनी यात्रेच्या आयोजनासाठी अधिक कार्यक्षम समन्वय प्रणाली उभारण्यावर सहमती दर्शवली. किरन रिजिजू यांच्यासोबत असीम आर. महाजन (अतिरिक्त सचिव - गल्फ विभाग) आणि राम सिंग (संयुक्त सचिव - हज विभाग) उपस्थित होते. त्यांनी रियाध येथील भारतीय दूतावास आणि जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हज तयारीचा आढावा घेतला. रिजिजू यांनी भारतीय अधिकाऱ्यांच्या कामाचं कौतुक करत, “सौदी प्रशासनासोबत समन्वय साधून भारतीय यात्रेकरूंच्या सोयीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत,” असं म्हटलं.

दौर्‍यादरम्यान मंत्री रिजिजू यांनी जेद्दाह आणि ताईफ येथील हज आणि उमराह सुविधांची पाहणी केली. त्यांनी जेद्दाह विमानतळावरील टर्मिनल-1, हरमैन रेल्वे स्टेशन यांची भेट घेऊन व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा तपासल्या. तसेच, त्यांनी भारतीय प्रवासी समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना आणि अनुभव ऐकले. या नव्या करारामुळे भारतातील हज यात्रेकरूंसाठी अधिक चांगल्या सुविधा, सुरक्षित प्रवास आणि आध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोन्ही देशांमधील हा करार धर्म, संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा नवा दुवा ठरणार आहे.

हेही वाचा: New Office Timings: या शहरात सरकारचा कंपन्यांना कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम देण्याचा सल्ला; काय आहे नेमकं कारण?


सम्बन्धित सामग्री