मुंबई: भारत आणि चीन यांच्यातील थेट विमानसेवा लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे यासंदर्भातील घोषणा केली. यानंतर, तात्काळ इंडिगो एअरलाइनने 26 ऑक्टोबरपासून दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात कोलकाता आणि ग्वांगझू दरम्यान उड्डाणे सुरू होणार असल्याचे इंडिगोने जाहीर केले.
कोलकाता ते ग्वांगझू या मार्गावर दररोज नॉन-स्टॉप विमाने सुरू होणार आहेत. कोलकाता व्यतिरिक्त, दिल्ली आणि ग्वांगझू दरम्यान देखील लवकरच थेट उड्डाणे सुरू केली जातील, अशी घोषणा एअरलाइनने केली. या उड्डाणांसाठी इंडिगो त्यांच्या एअरबस ए320 निओ विमानाचा वापर करणार आहे.
हवाई वाहतूक चार वर्षांनंतर पूर्ववत
भारत आणि चीनमधील थेट विमानसेवा कोरोना आजारामुळे 2020 मध्ये बंद करण्यात आली होती. हवाई सेवा बंद झाल्यानंतरच्या काळात गलवान व्हॅली संघर्षामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक बिघडले होते.
सुमारे चार वर्षांनंतर आता ही सेवा पुन्हा सुरू होत असल्यामुळे व्यापारी, पर्यटन आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या घोषणेनंतर इंडिगोने घेतलेला हा निर्णय दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सकारात्मकता दर्शवणारे पाऊल मानले जात आहे.