AI Apps: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञान स्वीकारण्यात भारतीयांनी जगभरात आघाडी घेतली आहे. मार्केट इंटेलिजेंस फर्म 'सेन्सर टॉवर'च्या (Sensor Tower) ताज्या अहवालानुसार, 2025 मध्ये भारत जनरेटिव्ह एआय ॲप डाउनलोडसाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ बनला आहे. भारतात या ॲप्सच्या डाउनलोडमध्ये वर्षानुवर्षे 207 टक्के वाढ झाली असून, वापराच्या बाबतीत भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. आज जगभरातील एकूण एआय ॲप्सपैकी सुमारे 20 टक्के म्हणजेच दर 5 पैकी 1 अॅप भारतात डाउनलोड केले जात आहे.
डाउनलोडमध्ये वाढ, पण महसुलाचा आकडा मात्र चिंताजनक
भारतात एआय ॲप्सचा वापरकर्ता आधार जरी प्रचंड असला, तरी त्याचे रूपांतर महसुलात होताना दिसत नाही. अहवालानुसार, 2025 मध्ये ॲप-मधील खरेदीमध्ये (In-app purchases) भारतीय वापरकर्त्यांचा वाटा केवळ 1 टक्के इतकाच होता. ॲप डाउनलोडमध्ये 320 टक्के वाढ झाली असली, तरी महसूल वाढीचा वेग मंदावला आहे. नोव्हेंबर महिन्यात ॲप-मधील खरेदी 22 टक्के आणि डिसेंबरमध्ये 18 टक्क्यांनी घसरली आहे, जे कंपन्यांसमोर एक मोठे आव्हान उभे करत आहे.
मोफत ऑफर्सचा मोठा परिणाम
भारतातील या प्रचंड डाउनलोड संख्येमागे तंत्रज्ञान कंपन्यांनी दिलेल्या 'मोफत' ऑफर्सचा मोठा वाटा आहे. गुगलने त्यांच्या एआय प्रो प्लॅनमध्ये एक वर्षाचा मोफत प्रवेश दिला, तर एअरटेलच्या सहकार्याने 'परप्लेक्सिटी'ने (Perplexity) आपला प्रो प्लॅन मोफत उपलब्ध करून दिला. ओपनएआयने (OpenAI) देखील 'चॅटजीपीटी गो'साठी (ChatGPT Go) एक वर्षाचा मोफत प्रवेश दिल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांच्या महसुलात 33 टक्के आणि डिसेंबरमध्ये 32 टक्के घट झाली. मात्र, तरीही भारतातील एकूण एआय महसुलात ओपनएआयचा वाटा 60 टक्के पेक्षा जास्त असून त्यांचे वर्चस्व कायम आहे.
हेही वाचा - Smart Mobile Settings: अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी 'स्मार्ट' टिप्स; रोजची कामे सोपी करणारे 'हे' भन्नाट फीचर्स तुम्हाला माहीत आहेत का?
दर आठवड्याला 100 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते
नुकत्याच पार पडलेल्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये एआयच्या वाढत्या प्रभावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी माहिती दिली की, एकट्या भारतात 'चॅटजीपीटी'चे दर आठवड्याला 100 दशलक्षाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. डीपसीक, ग्रोक आणि मेटा एआय यांसारख्या नवीन प्लॅटफॉर्मच्या एन्ट्रीमुळे ही स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. भारतीय वापरकर्ते वेगाने एआय ॲप्स आणि चॅटबॉट्स स्वीकारत असले, तरी त्यांना 'पेड सबस्क्रिप्शन'कडे वळवणे हे कंपन्यांसाठी आगामी काळातील सर्वात मोठे लक्ष्य असेल.