Monday, November 17, 2025 12:52:19 AM

AGTF Arrested Jagga : यूएस-कॅनडा सीमेवर लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य ताब्यात; बिश्नोई गँगला मोठा धक्का

राजस्थान AGTF ने अमेरिकेच्या मदतीने बिश्नोई गँगचा मुख्य सदस्य जगदीप सिंग उर्फ जग्गा यूएस-कॅनडा सीमेवर पकडला. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे.

agtf arrested jagga  यूएस-कॅनडा सीमेवर लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य ताब्यात बिश्नोई गँगला मोठा धक्का

जयपूर : राजस्थानातील गुन्हेगारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधून न्यायालयासमोर आणण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. राजस्थान अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने (Anti Gangster Task Force, AGTF) अमेरिकन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा महत्त्वाचा सदस्य जगदीप सिंग उर्फ जग्गा याला यूएस-कॅनडा सीमेवर ताब्यात घेण्यात यश मिळवले. सोमवारी पार पडलेली ही कारवाई भारतीय तपास यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय कायदा अंमलबजावणी संस्थांमधील प्रभावी समन्वयाचे उदाहरण मानली जात आहे.

अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) अधिकाऱ्यांनी AGTF च्या सूचनेवरून ही कारवाई केली. जग्गा हा रोहित गोडारा या गँग सदस्याच्या नियंत्रणाखाली सक्रिय असलेला गुन्हेगार असून, राजस्थान आणि पंजाबमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याची नोंद आहे. त्याच्यावर फरार होणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी, शस्त्रसाठा असे डझनभर हून अधिक गुन्हे दाखल असून अनेक प्रकरणांत न्यायालयाने अटक वॉरंटही जारी केले होते.

“जग्गा हा अत्यंत हिंसक पार्श्वभूमी असलेला गुन्हेगार असून त्याचे ताब्यात येणे हे बिश्नोई गँगच्या आंतरराष्ट्रीय जाळ्याला मोठा धक्का आहे,” असे AGTF चे अतिरिक्त महासंचालक दिनेश एम.एन. यांनी सांगितले. अचूक गुप्त माहिती, तांत्रिक देखरेख आणि धोरणात्मक समन्वयामुळे ही कारवाई शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: Seed Processing Revolution: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान यांच्या हस्ते ‘सीड मॅनेजमेंट 2.0’ चा शुभारंभ; बोगस बियाण्यांना बसणार आळा

जग्गा तीन वर्षांपूर्वी भारतातून पळून प्रथम दुबईला गेला आणि त्यानंतर चुकीच्या मार्गाने अमेरिकेत प्रवेश केला होता. त्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून भारतीय आणि परदेशी सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे ही कारवाई पार पाडली.

जग्गाच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये 2017 साली जयपूरच्या प्रतापनगर भागात डॉ. सुनील चांडक यांच्या खुनाच्या प्रयत्नाचा समावेश आहे. तसेच जोधपूरच्या सरदारपुरा येथे वासुदेव इस्राणी यांच्या हत्येच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. परदेशातही तो खंडणी आणि बेकायदेशीर शस्त्र व्यवहारात गुंतलेला असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

जग्गाच्या जलदगतीने भारतामध्ये प्रत्यर्पण प्रक्रियेसाठी AGTF आता अमेरिकन अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे. “जग कितीही दूर असले तरी गुन्हेगारांचा पाठलाग करण्याचे आमचे धोरण कायम राहील,” असा ठाम संदेश या मोहिमेद्वारे सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे.

हेही वाचा: Rajnath Singh: 'सीमेवर तत्परता वाढवा, कोणत्याही वेळी युद्ध शक्य'; संरक्षणमंत्र्यांचा सैन्य दलांना सूचक इशारा


सम्बन्धित सामग्री