Sunday, March 08, 2026 12:27:34 PM

India Pakistan Match: दहशतवाद की क्रिकेट? पाकिस्तानचा 'ब्लॅकमेल' प्लॅन; भारताशी सामना खेळण्यासाठी मांडल्या अजब अटी

भारत-पाकिस्तान टी20 विश्वचषक 2026 सामन्यावर अनिश्चितता निर्माण झाली असून, बहिष्कार मागे घेण्यासाठी पाकिस्तानने आयसीसीसमोर तीन अटी ठेवल्याची चर्चा आहे.

india pakistan match दहशतवाद की क्रिकेट पाकिस्तानचा ब्लॅकमेल प्लॅन भारताशी सामना खेळण्यासाठी मांडल्या अजब अटी

लाहोर: क्रिकेट जगतात ज्या सामन्याची सर्वाधिक प्रतीक्षा असते, तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान महासंग्राम! मात्र, 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमधील या हाय-व्होल्टेज सामन्यावर आता अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील हा सामना व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सध्या  'संपूर्ण ताकद' लावताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा यांनी लाहोरमध्ये धाव घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसिन नक्वी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांच्याशी तातडीची बैठक घेतली.

या बैठकीत पाकिस्तान आणि बांगलादेशने मिळून आयसीसीची मोठी कोंडी केल्याचे चित्र समोर आले आहे. मुळात हा वाद बांगलादेशने सुरू केला होता. भारतामध्ये खेळण्यास सुरक्षेचे कारण देत बांगलादेशने नकार दिला, ज्यावर आयसीसीने कडक भूमिका घेत बांगलादेशला स्पर्धेतूनच बाहेर काढले आणि त्यांच्या जागी स्कॉटलँडचा समावेश केला. आपल्या शेजारील देशाच्या समर्थनासाठी आता पाकिस्तानने भारतावर बहिष्काराचे अस्त्र उगारले असून, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीच या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, हा बहिष्कार मागे घेण्यासाठी पाकिस्तानने आयसीसीसमोर अटींचा डोंगर उभा केला आहे.

हेही वाचा: Parbhani ZP Result: एक घर, पाच उमेदवार... चार जणांचा पराभव; परभणीत सुरेश वरपुडकरांचा बालेकिल्ला ढासळला

पाकिस्तानच्या त्या तीन कडक अटी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसिन नक्वी यांनी आयसीसीसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. पहिली म्हणजे, आयसीसीच्या वार्षिक महसुलात पाकिस्तानला मोठा वाटा हवा आहे. दुसरी अट अधिक कठीण असून, भारतासोबतची द्विपक्षीय मालिका (Bilateral Series) तातडीने पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वात चकित करणारी तिसरी अट म्हणजे, मैदानावरील खेळाडूंमधील कटुता कमी करण्यासाठी भारतीय खेळाडूंनी सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे अनिवार्य करावे. आशिया चषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन टाळल्याचा राग या अटीमागे असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे, स्पर्धेतून बाहेर गेलेल्या बांगलादेशनेही आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बांगलादेशने आयसीसीकडे आर्थिक भरपाईची मागणी केली असून, आगामी काळात एका मोठ्या आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळावे, अशी अट अमिनुल इस्लाम यांनी मांडली आहे. जर या मागण्या मान्य झाल्या, तरच पाकिस्तान आपला बहिष्कार मागे घेण्यावर विचार करेल, अशी रणनीती या दोन्ही देशांनी आखल्याचे दिसते.

BCCI ची 'वज्रमूठ' आणि भारताची भूमिका

दरम्यान, पाकिस्तानच्या या अटींना भारत किंवा बीसीसीआय (BCCI) दाद देण्याची शक्यता धुसर आहे. भारताने नेहमीच 'दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालू शकत नाही' ही भूमिका ठामपणे मांडली आहे. 26/11 चा मुंबई हल्ला आणि त्यानंतर अलिकडेच झालेला पहलगाम येथील दहशतवादी हल्ला, यामुळे भारताने पाकिस्तानशी केवळ आयसीसी स्पर्धांपुरतेच संबंध मर्यादित ठेवले आहेत. अशा स्थितीत द्विपक्षीय मालिका सुरू करण्याची अट मान्य होणे निव्वळ अशक्य वाटते.

येत्या दोन दिवसांत या पेचावर तोडगा निघतो की भारत-पाकिस्तान सामना रद्द होऊन क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आयसीसी या अटींवर काय सुवर्णमध्य काढते, यावरच आता 2026 च्या वर्ल्ड कपचे आर्थिक आणि व्यावसायिक यश अवलंबून असणार आहे.

हेही वाचा: Rajmata Jijau Buses : एसटीच्या ताफ्यात आता 'राजमाता जिजाऊ' बस; पाहा कधीपासून सुरू आणि काय आहेत खास सुविधा


सम्बन्धित सामग्री