Saturday, March 07, 2026 09:24:04 AM

India Vs Pakistan Match: काय घडलं लाहोरच्या 'त्या' गुप्त बैठकीत? भारत-पाकिस्तान मॅचबद्दल मोठी अपडेट समोर

पीसीबी बहिष्काराचा निर्णय मागे घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत असून, हा हाय-व्होल्टेज सामना रंगण्याची शक्यता बळावली आहे.

india vs pakistan match काय घडलं लाहोरच्या त्या गुप्त बैठकीत भारत-पाकिस्तान मॅचबद्दल मोठी अपडेट समोर

नवी दिल्ली: क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लढत, अर्थात 'भारत विरुद्ध पाकिस्तान' या सामन्याकडे डोळे लावून बसलेल्या कोट्यवधी चाहत्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 15 फेब्रुवारीला कोलंबो येथे नियोजित असलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यावर अनिश्चिततेचे ढग दाटले होते, मात्र आता ते निवळण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) यशस्वी मध्यस्थीनंतर, सुरुवातीला बहिष्काराचे अस्त्र उगारणारे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आता 'यु-टर्न' घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

या वादावर पडदा टाकण्यासाठी आयसीसीने हुकमी एक्के बाहेर काढले आहेत. आयसीसीचे उपाध्यक्ष आणि जागतिक क्रिकेटमधील प्रभावशाली व्यक्तिमत्व इम्रान ख्वाजा रविवारी संध्याकाळी तातडीने लाहोरमध्ये आले आहेत. पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्वाजा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांची भेट घेऊन त्यांना या सामन्याचे महत्त्व पटवून दिले आहे.

"वादापेक्षा खेळ महत्त्वाचा" हा संदेश देत त्यांनी भारताविरुद्धची लढत खेळण्याबाबत पीसीबी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यामुळे आज, सोमवारी पाकिस्तान भूमिकेत बदल करून सामन्याला हिरवा कंदील दाखवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Matheran e-Rikshwa News : मोठी बातमी! माथेरानमध्ये उद्यापासून इ-रिक्षा चालकांचा संप, स्थानिकांसह पर्यटकांची होणार कोंडी

मुळात या वादाची ठिणगी बांगलादेशच्या मुद्द्यावरून पडली होती. भारतात खेळण्यास नकार दिल्याने आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. मित्रराष्ट्राला, अर्थात बांगलादेशला पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्तानने साखळी फेरीतील भारतासारख्या महत्त्वाच्या लढतीवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, "रागाच्या भरात केलेले नुकसान भरून निघत नाही," ही बाब आता पाकिस्तानच्या लक्षात येऊ लागली आहे. ही लढत रद्द झाली असती, तर श्रीलंका क्रिकेट बोर्ड, बीसीसीआय, पीसीबी, आयसीसी आणि मुख्य म्हणजे ब्रॉडकास्टर्सना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले असते.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने देखील या प्रकरणात पुढाकार घेत पीसीबीला ई-मेल पाठवून हा बहिष्कार मागे घेण्याची कळकळीची विनंती केली आहे. दुसरीकडे, आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी कोलंबोमध्ये श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आयसीसीवर दबाव टाकण्याचा पाकिस्तानचा हेतू असला तरी, क्रिकेटच्या पटलावर हा सामना न होणे कोणाच्याच हिताचे नाही, हे आता पीसीबीला उमजले आहे. बहिष्काराच्या भूमिकेवर सुरुवातीला ठाम असलेला पाकिस्तान आता मवाळ झाला असून, चर्चेतून मार्ग काढण्यावर भर दिला जात आहे.

दरम्यान, रविवारी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. पीसीबीने या भेटीची अधिकृत छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. पडद्यामागे सुरू असलेल्या या वेगवान घडामोडी आणि आयसीसीने घातलेली साद पाहता, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा थरारक सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या मैदानावर रंगणार, हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे.

हेही वाचा: Nitin Gadkari: गडचिरोली होणार आता देशाची 'स्टील राजधानी'; नितीन गडकरींनी मांडला साडेसात लाख कोटींच्या गुंतवणुकीचा 'रोडमॅप'


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या