Sukhoi Plane Crash: सुखोई दुर्घटनेत देशाने दोन शूर सुपुत्र गमावले; स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पुरवेश दुरागकर शहीद

आसाममधील कार्बी आंगलोंग परिसरात भारतीय वायुसेनेचे Su-30MKI लढाऊ विमान प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळले आहे.

Sukhoi Plane Crash: सुखोई दुर्घटनेत देशाने दोन शूर सुपुत्र गमावले; स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पुरवेश दुरागकर शहीद

आसाम: भारतीय वायुसेनेच्या (Indian Air Force, IAF) सुखोई Su-30MKI लढाऊ विमानाच्या दुर्घटनेत दोन धाडसी वैमानिकांना प्राण गमवावे लागल्याची दु:खद घटना समोर आली आहे. या अपघातात स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पुरवेश दुरागकर यांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे वायुसेना तसेच संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. भारतीय वायुसेनेने अधिकृत निवेदनाद्वारे दोन्ही अधिकाऱ्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी भारतीय वायुसेनेचे Su-30MKI लढाऊ विमान नियमित प्रशिक्षण मोहिमेवर असताना अचानक रडारवरून गायब झाले होते. हे विमान आसाम राज्यातील कार्बी आंगलोंग जिल्ह्याच्या आकाशात उड्डाण करत असताना त्याचा रडार संपर्क तुटला. संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानाचे उड्डाण सुरळीत सुरू असताना अचानक ग्राउंड कंट्रोलशी असलेला संपर्क तुटल्याची नोंद झाली.

विमान ज्या परिसरावरून उड्डाण करत होते तो भाग प्रामुख्याने डोंगराळ आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. संपर्क तुटताच भारतीय वायुसेनेने तातडीने सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. या मोहिमेत वायुसेनेच्या पथकांसोबत स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणाही सहभागी झाल्या. कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे शोधमोहीम आव्हानात्मक ठरली, तरीही बचाव पथकांनी मोठ्या प्रयत्नांनंतर दुर्घटनेचे ठिकाण शोधून काढले.

हेही वाचा: Pune Maval Accident: पुणे हादरले! शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवभक्तांवर काळाची झडप; रात्री दीड वाजता पुणे-मुंबई महामार्गावर…

मात्र या अपघातात दोन्ही वैमानिकांचे प्राण वाचू शकले नाहीत. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभागी होणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या निधनामुळे वायुसेनेला मोठा धक्का बसला आहे. भारतीय वायुसेनेने अधिकृत संदेशात शोकाकुल कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत या कठीण काळात त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहण्याचा विश्वास दिला आहे.

Su-30MKI हे भारतीय वायुसेनेच्या सर्वात सक्षम आणि बहुउद्देशीय लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. हवाई संरक्षण, आक्रमक मोहिमा आणि रणनीतिक कारवायांसाठी हे विमान महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या प्रकारच्या विमानाशी संबंधित कोणतीही दुर्घटना सुरक्षा यंत्रणांसाठी अत्यंत गंभीर मानली जाते.

यापूर्वीही Su-30MKI विमानांशी संबंधित काही अपघात घडले आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये असममधील तेजपूर परिसरात प्रशिक्षण मोहिमेदरम्यान एक विमान कोसळले होते, मात्र त्या वेळी दोन्ही वैमानिक सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते. तसेच मे 2015 मध्ये तेजपूर एअरफोर्स बेस जवळ उड्डाणानंतर काही अंतरावर आणखी एक Su-30MKI विमान कोसळले होते, परंतु त्या दुर्घटनेतही वैमानिकांनी वेळेत बाहेर पडून आपले प्राण वाचवले होते.

सध्याच्या दुर्घटनेनंतर या अपघातामागील नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. तांत्रिक बिघाड, हवामान किंवा इतर घटक यांची सखोल तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, देशाच्या सुरक्षेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या या दोन धाडसी वैमानिकांना संपूर्ण देशातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

हेही वाचा: Maharashtra Sarpanch Appointment: ग्रामपंचायत प्रशासक वादात हायकोर्टाचा हस्तक्षेप; सरपंचांच्या ‘आर्थिक’ अधिकारांना ब्रेक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number