जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माचिल आणि दुदनियाल परिसरात नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजल्याल्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली दिल्यानंतर जवानांनी गोळीबार केला आणि त्यानंतर ही चकमक घडली, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली.
भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. सोबतच, याठिकाणी आणखी दहशतवादी उपस्थित आहेत का? याची चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर, संपूर्ण भागाला सुरक्षा दलांनी वेढा दिला असून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. अलिकडेच, जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील बीरंथबु भागात देखील दहशतवाद्यांसोबत जम्मू - काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG) मध्ये चकमक झाली होती. त्यामुळे, संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात सुरक्षा यंत्रणा अदिक सर्तक झाल्या आहेत. सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू होणार असल्याने दहशतवादी बर्फवृष्टी आणि प्रतिकूल हवामानाचा फायदा घेऊन नियंत्रण रेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करू शकतात, असा अंदाज गृहमंत्रालयाने वर्तवला आहे.
हेही वाचा: Diwali Muhurat Trading 2025 Date and Timing: धनत्रयोदशी आणि दिवाळीला शेअर बाजार राहणार बंद; जाणून घ्या दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग कधी आहे?
नुकताच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीत सुरक्षा दलांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, लष्कर प्रमुख गृह सचिव गुप्तचर विभागाचे संचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जम्मू आणि काश्मीरमधील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून कोणत्याही घुसखोरीच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी सुरक्षा दलांना आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.