Friday, February 13, 2026 06:19:37 PM

Vande Bharat Sleeper Train: वंदे भारतचं तिकीट कॅन्सल करायचंय? डोकं शांत ठेवून तिकीट बुक करा; 'हा' नवा नियम वाचला नाही तर खिसा होईल रिकामा

हे नवे नियम पूर्वीपेक्षा अधिक कडक करण्यात आले आहेत. प्रवासाचे नियोजन ‘काटेकोर’ नसेल, तर प्रवाशांना तिकिटाचा एक रुपयाही परत मिळणार नाही, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे.

vande bharat sleeper train वंदे भारतचं तिकीट कॅन्सल करायचंय डोकं शांत ठेवून तिकीट बुक करा हा नवा नियम वाचला नाही तर खिसा होईल रिकामा

नवी दिल्ली: येत्या काळात Indian Railways च्या वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत-2 यांसारख्या आधुनिक गाड्यांनी प्रवास करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता थोडा जास्तीचा ‘झळ’ बसण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाने 16 जानेवारी 2026 पासून तिकीट रद्द करण्याच्या (Cancellation) नियमांमध्ये मोठे फेरबदल केले असून, हे नवे नियम पूर्वीपेक्षा अधिक कडक करण्यात आले आहेत. प्रवासाचे नियोजन ‘काटेकोर’ नसेल, तर प्रवाशांना तिकिटाचा एक रुपयाही परत मिळणार नाही, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे.

रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासी नियम, 2015 मध्ये सुधारणा करून हे नवीन Amendment Rules 2026 लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार, जर तुम्ही गाडी सुटण्याच्या निर्धारित वेळेपूर्वी आठ तासांच्या आत तिकीट रद्द केले, तर तुम्हाला कोणताही परतावा (Refund) मिळणार नाही. विशेष म्हणजे, सर्वसाधारण गाड्यांसाठी ही मर्यादा चार तासांची असते, परंतु Vande Bharat Sleeper आणि Amrit Bharat-2 साठी ही मर्यादा दुपटीने वाढवून आठ तास करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता प्रवासाचा निर्णय अधिक आधी घ्यावा लागणार आहे.

तिकीट रद्द करण्याच्या शुल्काचे गणितही आता बदलले आहे. जर प्रवाशाने गाडी सुटण्याच्या वेळेपूर्वी 72 तासांपेक्षा जास्त काळ आधी तिकीट रद्द केले, तर एकूण भाड्याच्या 25 टक्के रक्कम कापली जाईल. तर 72 तास ते आठ तास या कालावधीत तिकीट रद्द केल्यास प्रवाशाला थेट 50 टक्के रक्कमेचा फटका सोसावा लागणार आहे. म्हणजेच ऐनवेळी प्रवासाचा बेत बदलला, तर अर्धे पैसे रेल्वेच्या तिजोरीत जमा होतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेल्वेगाडी सुटायच्या वेळी जर का तुम्ही तिकीट रद्द केलं तर तुम्हाला काहीच परतावा नाही मिळणार हे सुद्धा लक्षात घेणं महत्वाचे आहे. 

हेही वाचा: Asim Sarode : 'जनतेच्या पैशांचा गैरवापर आणि उधळपट्टी सुरु आहे का?'; दावोसमधील करारांवरून अ‍ॅड. असीम सरोदेंचे मुख्यमंत्र्यांना खडेबोल

या कडक नियमामागे रेल्वे प्रशासनाचे स्पष्ट कारण आहे. वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत-2 या गाड्यांमध्ये RAC (Reservation Against Cancellation) किंवा वेटिंग लिस्टची सुविधा नसून, केवळ Confirm Berth देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे या गाड्यांचा आरक्षण चार्ट आता आठ तास आधीच तयार केला जाणार आहे.

चार्ट लवकर तयार होत असल्यामुळे शेवटच्या क्षणी तिकीट रद्द झाल्यास त्या जागेवर दुसरा प्रवासी मिळवणे रेल्वेसाठी कठीण ठरते. परिणामी होणारा महसुली तोटा टाळण्यासाठीच रेल्वेने ‘नियम कडक, तरच प्रवास सुखद’ असे धोरण अवलंबल्याचे स्पष्ट केले जात आहे.

थोडक्यात सांगायचे तर, आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवान प्रवासाचा आनंद घेताना आता प्रवाशांना आपल्या वेळेचे नियोजनही तितकेच काटेकोर ठेवावे लागणार आहे. “वेळ कोणासाठी थांबत नाही” हे रेल्वेच्या या नव्या नियमांनी प्रवाशांना चांगलेच पटवून दिले आहे. त्यामुळे यापुढे तिकीट आरक्षित करताना शंभर वेळा विचार करूनच पाऊल उचलणेच शहाणपणाचे ठरेल.

हेही वाचा: Gold Silver Price Hike: मौल्यवान धातूंचा बाजार पेटला; सोन्याने ओलांडली दीड लाखांची वेस, तर चांदीचा सुद्धा 'रुबाब', वाचा काय सांगतायत तज्ञ


सम्बन्धित सामग्री