Guwahati Bengaluru IndiGo flight: गुवाहाटी येथून बंगळुरूकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाला लँडिंगदरम्यान एका असामान्य आणि भीषण प्रसंगाला सामोरे जावे लागले. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kempegowda International Airport) धावपट्टीवर उतरत असताना विमानाचा मागचा भाग अचानक रनवेला स्पर्श झाला. विमानाचे उड्डाण 6E 6542 असे असून, सुदैवाने या घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स पूर्णपणे सुरक्षित राहिले आहेत.
जोरदार वाऱ्यांमुळे पहिला प्रयत्न निष्फळ; दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग
इंडिगोने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, रविवारी लँडिंगच्या पहिल्या प्रयत्नात विमानाला अत्यंत प्रतिकूल हवामान आणि तुफान वाऱ्याचा सामना करावा लागला. धावपट्टीला असामान्य स्पर्श (Unusual Runway Contact) झाल्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत तातडीने ‘गो-अराऊंड’ (Go-Around) केले आणि विमान पुन्हा हवेत घेतले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमानाचे केम्पेगौडा विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात यश आले.
हेही वाचा – कुपवाडामध्ये भीषण रस्ते अपघात; वाहन दरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी
तांत्रिक तपासणी सुरू; पुढील प्रवासासाठी पर्यायी विमानाची सोय
या घटनेनंतर संबंधित विमानाला पुढील उड्डाणांसाठी रोखून धरण्यात आले असून, मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) त्याची सखोल देखभाल तपासणी (Maintenance Check) केली जात आहे. आवश्यक तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतरच हे विमान पुन्हा सेवेत दाखल होईल. दरम्यान, या विमानाची पुढील ठरलेली बंगळुरु-कोयंबतूर सेवा विनाव्यत्यय सुरू ठेवण्यासाठी इंडिगो प्रशासनाने तातडीने दुसऱ्या पर्यायी विमानाची व्यवस्था केली होती.
नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाला सूचना; प्रवाशांची सुरक्षा सर्वोच्च
या घडामोडीबाबत सर्व संबंधित नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला वेळेत सूचित करण्यात आले असल्याचे एयरलाइनने स्पष्ट केले आहे. ‘आमच्यासाठी सर्व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हीच नेहमी सर्वोच्च प्राथमिकता राहिली आहे,’ असे इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले. सुदैवाने विमान किंवा प्रवाशांचे कोणतेही मोठे नुकसान झाले नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.