इंदूर : स्वतःच्या तीन वर्षांच्या मुलीला ब्रेन ट्यूमरचे निदान झाले होते. तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. तिला तशा स्थिती पाहणे अत्यंत वेदनादायक असल्याने तिच्या पालकांनी तिला संथारा व्रत देण्याचा निर्णय घेतला. जैन धर्मात जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूच्या जवळ असते, तेव्हा तिची लवकर सुटका व्हावी, या हेतूने तिला संथारा व्रत दिले जाते.
मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका आध्यात्मिक गुरूच्या सल्ल्यानुसार तिच्या पालकांनी तिला जैन धार्मिक परंपरेनुसार मृत्युपर्यंत उपवास करण्यास सुरुवात केली. यानंतर ब्रेन ट्यूमरने ग्रस्त असलेल्या या तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तिच्या पालकांनी सांगितले की, त्यांची एकुलती एक मुलगी वियाना जैन हिने 21 मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला.
संथारा : या व्रताला 'सल्लेखना' म्हणूनही ओळखले जाते. हा जैन धर्मातील स्वेच्छेने मृत्युपर्यंत उपवास करण्याची एक विधी आहे. या प्रथेनुसार, आध्यात्मिक शुद्धीकरण आणि जगापासून अलिप्तता मिळविण्यासाठी व्यक्ती मृत्यूपर्यंत अन्न आणि पाण्याचे सेवन हळूहळू कमी करते.
हेही वाचा - Shri Kedarnath Dham 2025 : केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; भक्तिमय वातावरणात तीर्थयात्रेला सुरुवात
वियानाच्या पालकांनी सांगितल्यानुसार, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने याची दखल घेतली आहे आणि 'जैन धर्मातील संथारा व्रत करणारी जगातील सर्वात लहान व्यक्ती' म्हणून वियानाच्या नावाने प्रमाणपत्र जारी केले आहे.
आयटी व्यावसायिक म्हणून काम करणाऱ्या वियानाच्या पालकांचे म्हणणे आहे की, त्यांनी जैन मुनी (भिक्षू) यांच्या सल्ल्यानंतर त्यांच्या मुलीला संथारा व्रत घेण्याचा निर्णय घेतला. शनिवारी पीटीआयशी बोलताना मुलीचे वडील पीयूष जैन म्हणाले, 'माझ्या मुलीला या वर्षी जानेवारीमध्ये ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर तिची प्रकृती सुधारली. परंतु मार्चमध्ये तिची प्रकृती बिघडली आणि तिला खाण्यापिण्यात अडचण येऊ लागली.'
21 मार्चच्या रात्री, ते त्यांच्या गंभीर आजारी मुलीला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह जैन भिक्षू राजेश मुनी महाराज यांच्याकडे दर्शनासाठी घेऊन गेले. 'महाराजांनी माझ्या मुलीची प्रकृती पाहिली आणि आम्हाला सांगितले की, मुलीचा अंत जवळ आला आहे आणि तिला संथारा व्रत करायला हवे. जैन धर्मात या व्रताला खूप महत्त्व आहे. याबद्दल विचार केल्यानंतर, आम्ही शेवटी ते करण्यास तयार झालो,' ते म्हणाले.
जैन म्हणाले की, भिक्षूंनी संथारा व्रत पूर्ण केल्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला.
त्यांनी असेही सांगितले की, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांच्या मुलीचे नाव नोंदवले आहे आणि जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र जारी केले आहे ज्यामध्ये तिचे नाव 'जैन विधी संथारा व्रत करणारी जगातील सर्वात लहान व्यक्ती' म्हणून नमूद केले आहे.
वियानीची आई वर्षा जैन म्हणाल्या, 'माझ्या मुलीला संथारा व्रत करायला लावण्याचा निर्णय किती कठीण होता, हे मी सांगू शकत नाही. माझ्या मुलीला ब्रेन ट्यूमरमुळे खूप त्रास होत होता. तिला या अवस्थेत पाहून मला खूप वेदना होत होत्या.'
वियानाला आठवून तिची आई भावनिक झाली आणि म्हणाली, 'माझी मुलगी तिच्या पुढच्या जन्मात नेहमीच आनंदी राहावी अशी माझी इच्छा आहे.'
हेही वाचा - मोठी अपडेट! कैलास मानसरोवर यात्रा लवकरच पुन्हा सुरू होणार..
जैन समुदायाच्या धार्मिक परिभाषेत, संथाराला 'सल्लेखना' आणि 'समाधी मरण' असेही म्हणतात. या प्राचीन प्रथेनुसार, जेव्हा त्याला वाटते की, त्याचा अंत आला आहे, तेव्हा तो अन्न, पाणी आणि सांसारिक गोष्टींचा त्याग करून मृत्यूला आलिंगन देतो.
2015 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि 309 (आत्महत्येचा प्रयत्न) अंतर्गत संथारा प्रथेला दंडनीय गुन्हा घोषित केल्यानंतर कायदेशीर आणि धार्मिक वर्तुळात संथारावरील वादविवाद तीव्र झाला.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने जैन समुदायाच्या विविध धार्मिक संस्थांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली.