चंद्रकांत शिंदे, नवी दिल्ली: गेल्या दोन आठवड्यांपासून इंदोरमधील एका दाम्पत्याच्या बेपत्ता होण्याची आणि नंतर त्यातील पतीच्या हत्येची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पत्नी सोनम आणि पती राजा रघुवंशी हे 22 मे रोजी शिलाँगमधून बेपत्ता झाले होते. 2 जून रोजी सोनमच्या पती राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यामुळे त्याची हत्या झाली हे स्पष्ट झाले. मात्र, या घटनेनंतर पत्नी सोनम रघुवंशी बेपत्ता होती. अखेर, उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील एका ढाब्यावर सोनम बेशुद्ध अवस्थेत आढळली. तसेच, भाडोत्री हल्लेखोरांच्या मदतीने पत्नी सोनमनेच तिच्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काय म्हणाले मेघालयचे मुख्यमंत्री?
यासंदर्भात, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी सोमवारी सकाळी एक्सवर पोस्ट करून मेघालय पोलिसांना मोठं यश मिळाल्याचं म्हटलं आहे. '7 दिवसांच्या आत मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशी हत्या प्रकरणाच्या तपासात मोठं यश मिळवलं आहे. मूळच्या मध्य प्रदेशच्या तीन हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. सदर महिलेनंही पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून आणखी एका हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम चालू आहे', अशी माहिती कोनराड संगमा यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
सोनमने कुटुंबीयांना सांगितला ठावठिकाणा:
माहितीनुसार, सोनमने कुटुंबीयांना फोन करून स्वतःचा ठावठिकाणा सांगितला. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी इंदूर पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच, इंदूर पोलिसांनी तातडीने गाझीपूरमधील पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे, गाजीपूर पोलिसांनी तात्काळ एका ढाब्यावर जाऊन सोनमला अटक केली.
भाडोत्री हल्लेखोरांना दिली होती सोनमने हत्येची सुपारी:
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी सोनमनेच भाडोत्री हल्लेखोरांना पती राजा रघुवंशीच्या हत्येची सुपारी दिली होती. हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट असलं, तरी या प्रकरणाला मिळालेल्या नाट्यमय वळणामुळे पोलिसदेखील चक्रावून गेले आहेत. एका स्थानिक गाईडने सांगितले होते की, 'राजा रघुवंशी आणि सोनम यांना बेपत्ता होण्यापूर्वी मी त्यांना तीन लोकांसोबत पाहिले होते'. त्याने असेही म्हटले होते की, 'ते हिंदीत बोलत होते'. पोलिसांना संशय आहे की या तिघांनी राजा रघुवंशीची हत्या केली.
सोनमच्या पतीचं मृतदेह मेघालयमधील एका खोल दरीत:
11 मे रोजी सोनम आणि राजा रघुवंशीचा विवाह झाला होता. 20 मे रोजी दोघेही मधुचंद्रासाठी मेघालयला निघाले होते. आधी गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे नवदाम्पत्य गेले होते. तिथून, 'आम्ही शिलाँगला जातो', असं या नवदाम्पत्यांनी कुटुंबीयांना फोन करून सांगितले. मात्र, 23 मे पासून दोघेही बेपत्ता होते. काही दिवसानंतर सोनमच्या पती राजा रघुवंशीचा (वय: 28) मृतदेह मेघालयमधील एका खोल दरीत सापडला होता.