Mumbai Extortion Case : व्यापाऱ्याला 3.25 कोटींचा गंडा; आधी गुंतवणुकीचा बहाणा आणि नंतर बंदुकीचा धाक दाखवून लुटलं, 9 जणांवर गुन्हा दाखल

या व्यापाऱ्याची ओळख ब्रोकर म्हणवून घेणाऱ्या काही आरोपींशी झाली होती. त्यांनी या व्यापाऱ्याला एका बड्या कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

Mumbai Extortion Case : व्यापाऱ्याला 3.25 कोटींचा गंडा; आधी गुंतवणुकीचा बहाणा आणि नंतर बंदुकीचा धाक दाखवून लुटलं, 9 जणांवर गुन्हा दाखल

Mumbai Cheating and Extortion Case : मुंबईतील एका खासगी उद्योजकाला गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 3.25 कोटी रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यामध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. हे आरोपी महाराष्ट्र, ओडिशा, बिहार आणि झारखंड अशा विविध राज्यांमधील रहिवासी असून त्यांची एक मोठी आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जुलै 2025 मध्ये या व्यापाऱ्याची ओळख ब्रोकर म्हणवून घेणाऱ्या काही आरोपींशी झाली होती. त्यांनी या व्यापाऱ्याला एका बड्या कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

नियोजनबद्ध फसवणूक
ही फसवणूक अतिशय नियोजनबद्ध होती. आरोपींच्या सांगण्यावरून व्यापाऱ्याने सुरुवातीला 1 कोटी रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले; परंतु, ही रक्कम ज्या कंपनीचे नाव सांगण्यात आले होते तिथे न जाता 'मानव धर्मयोग' नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या (NGO) खात्यात जमा झाली. जेव्हा व्यापाऱ्याने याबाबत जाब विचारला, तेव्हा त्याला आणि त्याच्या कंपनीच्या जनरल मॅनेजरला विलेपार्ले येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेनजीकच्या एका हॉटेलमध्ये भेटीसाठी बोलावण्यात आले. तिथे या दोघांवर हल्ला करण्यात आला आणि आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा – Titwala Drugs Case : टिटवाळ्यात ड्रग्ज रॅकेटचा भंडाफोड! ‘ड्रग्ज क्वीन' अँटी नार्कोटिक्सच्या गळाला

हॉटेलमध्ये ओलीस ठेवून खंडणीची मागणी
हॉटेलमध्ये ओलीस ठेवल्यानंतर आरोपींनी व्यापाऱ्याकडे 3 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. घाबरलेल्या व्यापाऱ्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांमध्ये त्वरित 2.25 कोटी रुपये ट्रान्सफर केले. पैसे मिळाल्यावर आरोपींनी त्याला सोडले, पण पोलिसांत गेल्यास गंभीर परिणाम भोगण्याची ताकीद दिली. मात्र, कुटुंबीय आणि मित्रांच्या सल्ल्यानंतर या व्यापाऱ्याने धैर्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. प्राथमिक पडताळणीनंतर पोलिसांनी फसवणूक, खंडणी, मारहाण आणि धमकी देण्यासारख्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

शहानिशा केल्याशिवाय गुंतवणूक न करण्याचे पोलिसांचे आवाहन
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपासासाठी हा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे (Crime Branch) सोपवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, ही टोळी केवळ मुंबईतच नाही, तर देशभरात अशा प्रकारे श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात ओढून लुटण्याचे काम करते. सध्या पोलीस या नऊ आरोपींचा शोध घेत असून, त्यांच्या बँक खात्यांची माहिती गोळा केली जात आहे. मुंबईतील उद्योजकांमध्ये या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून मोठ्या गुंतवणुकी करताना सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा – Nagpur: एनजीओच्या आड धर्मांतराचा प्रकार! रियाज काजीचा हिंदू तरुणींवर दबाव; नाशिकनंतर नागपुरातही धक्कादायक प्रकार उघडकीस

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number