Iran Crisis : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचे ढग गडद झाले आहेत. हे युद्ध जर अधिक काळ लांबले, तर त्याचा सर्वात मोठा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ आणि पुरवठा साखळीतील अडथळे यामुळे केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. या संकटामुळे आगामी काळात इंधनाचे दर गगनाला भिडून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत 'हॉलीवूड' स्टाईल उसळी
गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतींनी 90 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. कतारचे ऊर्जा मंत्री साद अल-काबी (Saad Al-Kaabi) यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, जर हा संघर्ष असाच सुरू राहिला, तर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 150 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. इतकेच नाही तर नैसर्गिक वायूचे दरही वाढून 40 डॉलर प्रति MMBtu पर्यंत जाऊ शकतात, जे युद्धापूर्वीच्या तुलनेत जवळपास 4 पट जास्त आहेत. आखाती देशांतील कंपन्यांना 'फोर्स मेज्योर' (Force Majeure) जाहीर करावे लागल्यास पुरवठा पूर्णपणे ठप्प होऊ शकतो.
भारताच्या जीडीपीला बसणार मोठा तडा
भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत घातक ठरू शकते. SMC Global Securities च्या कमोडिटी रिसर्च प्रमुख वंदना भारती यांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी प्रत्येक 10 डॉलरची वाढ भारताच्या GDP वर सुमारे 0.5 टक्के इतका नकारात्मक परिणाम करू शकते. अलीकडच्या काळात किमती आधीच 10 ते 15 डॉलरने वाढल्या आहेत. यामुळे देशातील महागाई वाढून विकासदराचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. याशिवाय विमा प्रीमियम आणि मालवाहतुकीचा खर्च वाढल्याने 'वॉर प्रीमियम'चा अतिरिक्त भारही भारताला सोसावा लागत आहे.
युद्धजन्य परिस्थिती आणि ताजी अपडेट
पश्चिम आशियातील युद्धाचा आज 7 वा दिवस असून परिस्थिती अधिक तीव्र होत आहे. इस्रायलने दावा केला आहे की त्यांनी तेहरानमधील (Tehran) अशा बंकरवर हल्ला केला आहे, जिथे इराणचे वरिष्ठ नेतृत्व वास्तव्यास होते. दरम्यान, अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इराणकडून होणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये 90 टक्के आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये 83 टक्के घट झाली आहे. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची चिन्हे असली तरी, समुद्री मार्ग आणि टँकरची वाहतूक पुढील 2 ते 3 आठवडे विस्कळीत राहिल्यास तेलाचा भडका उडणे अटळ आहे.
गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण
या अनिश्चिततेमुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदार आता अधिक सावध झाले असून सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. जर कच्च्या तेलाच्या किमती खरोखरच 150 डॉलरपर्यंत गेल्या, तर भारतीय बाजारपेठेत हाहाकार माजू शकतो. कच्च्या तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या भारतासाठी ही परिस्थिती 'आगीतून फुफाट्यात' जाण्यासारखी आहे. आता सर्वांचे लक्ष जागतिक महासत्तांच्या मध्यस्थीवर आणि आखाती देशांतील तेल उत्पादक कंपन्यांच्या निर्णयाकडे लागले आहे.
हेही वाचा – Middle East Conflict: 'इराणने शरणागती पत्करली, तो आता…'; ट्रम्प यांचा मोठा दावा