Iran Attacks Indian Ships: होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये (Strait of Hormuz) तणाव कमालीचा वाढला असून इराणी नौदलाने भारतीय ध्वज असलेल्या दोन व्यापारी जहाजांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘सॅनमार हेराल्ड’ (Sanmar Herald) आणि ‘जग अर्णव’ (Jag Arnav) अशी या दोन जहाजांची नावे आहेत. अमेरिकेने लादलेल्या नाकेबंदीला प्रत्युत्तर म्हणून इराणने हा जलमार्ग बंद करण्याची घोषणा केल्यानंतर ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे आखाती प्रदेशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून भारताने यावर अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
भारताचा राजनैतिक स्तरावर तीव्र निषेध
भारतीय जहाजांवरील गोळीबाराच्या घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने पावले उचलली आहेत. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता इराणचे भारतातील राजदूत डॉ. मोहम्मद फथअली यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून अधिकृतपणे तीव्र निषेध नोंदवण्यात आला. आंतरराष्ट्रीय जलमार्गावर भारतीय जहाजांना लक्ष्य करणे हे अत्यंत गंभीर असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
20 लाख बॅरल्स कच्चे तेल घेऊन जाणारा टँकर धोक्यात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणी नौदलाने ओमानच्या उत्तरेस या विशाल भारतीय टँकरवर गोळीबार केला. या टँकरमध्ये इराकचे सुमारे 20 लाख बॅरल्स कच्चे तेल भरलेले होते. इराणी गनबोट्सच्या (लढाऊ बोटी) गोळीबारानंतर या जहाजांना आपला मार्ग बदलावा लागला आणि त्यांनी पश्चिमेकडे ‘यू-टर्न’ घेतला. इराणच्या ‘तस्नीम’ वृत्तसंस्थेने या वृत्ताला दुजोरा दिला असून, सामुद्रधुनी बंद असताना प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही कारवाई केल्याचे म्हटले आहे.
भारतीय नौदल अलर्ट मोडवर; माहिती गोळा करण्याचे काम सुरू
या घटनेवेळी हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये भारतीय नौदलाचे कोणतेही जहाज उपस्थित नव्हते. सध्या भारतीय नौदलाच्या 2 विनाशिका (destroyers), 1 फ्रिगेट आणि 1 टँकर ओमानच्या आखातात तैनात आहेत. नौदल सध्या या घटनेची सविस्तर माहिती गोळा करत आहे. दरम्यान, ब्रिटिश नौदलानेही माहिती दिली आहे की, अनेक व्यापारी जहाजांना इराणी नौदलाकडून रेडिओ संदेश प्राप्त झाले आहेत, ज्यामध्ये सामुद्रधुनी पुन्हा एकदा पूर्णपणे बंद केल्याचा इशारा देण्यात आला आहे.
India lodged a protest with the Ambassador of Iran to India, Dr. Mohammad Fathali over the incident of firing on an Indian vessel at Strait of Hormuz. https://t.co/berBzGAtk4 — ANI (@ANI) April 18, 2026
पर्शियन आखातात शेकडो जहाजे अडकली; जागतिक तेल पुरवठा विस्कळीत
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे 28 फेब्रुवारीपासून पर्शियन आखातात शेकडो जहाजे अडकून पडली आहेत. सौदी अरेबिया, युएई, इराक आणि कुवेत यांसारख्या प्रमुख तेल उत्पादक देशांना त्यांच्या निर्यातीत मोठ्या अडचणी येत आहेत. जर हा जलमार्ग तातडीने मोकळा झाला नाही, तर जागतिक बाजारपेठेत इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण होऊन किमती गगनाला भिडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.