Sunday, March 08, 2026 01:10:37 PM

Instagram Safety Survey : तुमची मुलं इन्स्टाग्रामवर किती सुरक्षित? मेटाच्या अंतर्गत सर्व्हेतून धक्कादायक वास्तव समोर

मार्च 2025 मध्ये इन्स्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी यांनी दिलेल्या साक्षीतील काही उतारे समोर आले असून, त्यामध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

instagram safety survey  तुमची मुलं इन्स्टाग्रामवर किती सुरक्षित मेटाच्या अंतर्गत सर्व्हेतून धक्कादायक वास्तव समोर

Instagram Safety Survey : सोशल मीडिया दिग्गज 'मेटा' (Meta) च्या मालकीचे इन्स्टाग्राम तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असले, तरी या प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे एका कायदेशीर कागदपत्रातून उघड झाले आहे. मार्च 2025 मध्ये इन्स्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी यांनी दिलेल्या साक्षीतील काही उतारे समोर आले असून, त्यामध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

काय सांगतोय सर्व्हे?
कॅलिफोर्नियातील एका खटल्यादरम्यान सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, 13 ते 15 वयोगटातील सुमारे 19 टक्के युझर्सनी मान्य केले की, त्यांना इन्स्टाग्रामवर असा अश्लील किंवा नग्न मजकूर (Content) दिसला, जो त्यांना पाहायचा नव्हता. सुमारे 8 टक्के किशोरवयीन युझर्सनी इन्स्टाग्रामवर कोणालातरी स्वतःला इजा करून घेताना किंवा तशी धमकी देताना पाहिले आहे.

मेटाची भूमिका आणि अ‍ॅडम मोसेरी यांची कबुली
अ‍ॅडम मोसेरी यांनी मान्य केले की, कंपनी सामान्यतः अशा प्रकारचे अंतर्गत सर्व्हे सार्वजनिक करत नाही. हे निकाल युझर्सच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित असल्याने ते पूर्णपणे अचूक नसतील, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, या माहितीमुळे सोशल मीडिया आणि मुलांचे मानसिक आरोग्य यावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. 'जास्तीत जास्त आक्षेपार्ह मजकूर हा खासगी मेसेजद्वारे (DMs) शेअर केला जातो. युझर्सची गोपनीयता राखणे आणि कंटेंटवर नियंत्रण मिळवणे यामध्ये संतुलन राखणे हे कंपनीपुढील मोठे आव्हान आहे,' असंही मोसेरी यांनी म्हटलं आहे.  

मेटावर व्यसनाचे आरोप
दरम्यान, मेटा कंपनीवर सध्या अमेरिकेत हजारो खटले सुरू आहेत. तरुणांना जास्तीत जास्त वेळ प्लॅटफॉर्मवर खिळवून ठेवण्यासाठी (Addiction) जाणीवपूर्वक अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहे, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा गंभीर आरोप कंपनीवर आहे.

हेही वाचा - AI Apps Use In India : AI ॲप डाउनलोडमध्ये भारत जगात अव्वल; पण 'या' बाबतीत अजूनही पिछाडीवरच

2025 अखेरपर्यंत नवीन उपाययोजना
वाढत्या टीकेनंतर मेटाने घोषणा केली आहे की, 2025 च्या अखेरपर्यंत नग्नता किंवा लैंगिक क्रियाकलाप दर्शवणारे फोटो आणि व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून पूर्णपणे काढून टाकले जातील. यामध्ये 'एआय' (AI) द्वारे तयार केलेल्या कंटेंटचाही समावेश असेल. केवळ शैक्षणिक किंवा वैद्यकीय संदर्भातील मजकुराला अपवाद म्हणून परवानगी दिली जाईल.


सम्बन्धित सामग्री