ISRO: भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली क्षमता सिद्ध केली आहे. बुधवारी सकाळी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण स्थळावरून LVM3-M6 या प्रक्षेपण वाहनाच्या सहाय्याने ‘ब्लूबर्ड ब्लॉक-2’ हा महत्त्वाकांक्षी कम्युनिकेशन उपग्रह यशस्वीपणे अवकाशात झेपावला. हा उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) तैनात करण्यात येणार असून, प्रक्षेपणानंतर अवघ्या १५ मिनिटे ४० सेकंदांत तो निश्चित कक्षेत पोहोचणार आहे.
ब्लूबर्ड ब्लॉक-2 हा आजपर्यंत लो अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवण्यात आलेला सर्वात मोठा व्यावसायिक दळणवळण उपग्रह मानला जातो. विशेष म्हणजे, भारतीय भूमीवरून LVM3 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात जड कमर्शियल पेलोड आहे. त्यामुळे इस्रोच्या प्रक्षेपण क्षमतेवर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
इस्रोने प्रक्षेपित केलेला ब्लूबर्ड ब्लॉक-2 उपग्रह (AST SpaceMobile साठी) हा प्रचंड आकाराचा (सुमारे ६.५ टन) आणि शक्तिशाली असल्याने त्याला ‘बाहुबली-2’ असेही ओळखले जाते. हा उपग्रह थेट सामान्य स्मार्टफोनवर 4G/5G कनेक्टिव्हिटी पुरविण्यास सक्षम आहे आणि मोबाइल कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांती घडवण्याची क्षमता ठेवतो.
#WATCH | Sriharikota, Andhra Pradesh | ISRO's LVM3 M6 mission lifts off from the Satish Dhawan Space Centre, carrying the BlueBird Block-2 satellite into orbit, as part of a commercial deal with U.S.-based AST SpaceMobile. The mission will deploy the next-generation… pic.twitter.com/VceVBLOU5n — ANI (@ANI) December 24, 2025
हा उपग्रह अमेरिकेतील AST SpaceMobile या कंपनीने विकसित केला असून, पुढील पिढीच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 सॅटेलाइट मालिकेचा तो एक भाग आहे. या उपग्रहाचा मुख्य उद्देश म्हणजे थेट सामान्य स्मार्टफोनवरून सॅटेलाइटद्वारे मोबाईल कनेक्टिव्हिटी देणे. यामुळे दुर्गम भागातही कोणत्याही विशेष उपकरणांशिवाय 4G आणि 5G सेवा उपलब्ध होणार आहेत.
या सॅटेलाइट प्रणालीमुळे जगभरात कुठेही, कधीही व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल, मेसेजिंग, डेटा आणि स्ट्रीमिंग सेवा वापरता येणार आहेत. ब्लूबर्ड ब्लॉक-2 मध्ये तब्बल 223 चौरस मीटरचा फेज्ड अॅरे वापरण्यात आला असून, ही रचना त्याला जगातील सर्वात मोठा कमर्शियल कम्युनिकेशन उपग्रह बनवते.
LVM3-M6 ही LVM3 मालिकेतील सहावी ऑपरेशनल मोहीम असून, ही तिसरी पूर्णपणे व्यावसायिक स्वरूपाची उड्डाण मोहीम आहे. याआधी LVM3 ने चांद्रयान-2, चांद्रयान-3 तसेच वनवेबच्या दोन मोहिमांमध्ये एकूण ७२ उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले होते. LVM3 चे मागील उड्डाण CMS-03 उपग्रहासह नोव्हेंबर २०२५ मध्ये यशस्वी झाले होते.
ब्लूबर्ड ब्लॉक-2 मोहिमेमुळे इस्रोची व्यावसायिक प्रक्षेपण सेवा अधिक मजबूत झाली असून, भारत अवकाश तंत्रज्ञानातील एक विश्वासार्ह जागतिक भागीदार म्हणून पुढे येत आहे. भविष्यातील सॅटेलाइट-आधारित मोबाईल नेटवर्कसाठी ही मोहीम क्रांतिकारक ठरणार आहे.