Jaipur School Amaira Bullying Video before Death : जयपूरमधील प्रसिद्ध नीरजा मोदी स्कूलमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेला जवळपास 8 महिने पूर्ण झाल्यानंतर आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका 9 वर्षीय निष्पाप विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या काही तास आधी वर्गात नेमके काय घडले होते, याचा उलगडा करणाऱ्या एका नव्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजने खळबळ उडवून दिली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीच हे फुटेज समोर आणले असून, त्यांच्या मुलीला वर्गात वारंवार त्रास दिला जात होता आणि तिने मदतीसाठी केलेले प्रयत्न दुर्लक्षित राहिले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. राजस्थान पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर पालकांनी हा व्हिडिओ सार्वजनिक केला असून न्यायाची मागणी केली आहे.
नीरजा मोदी स्कूलमधील ती काळी रात्र
गतवर्षी 1 नोव्हेंबर रोजी घडलेली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, ज्या दिवशी ‘अमायरा’ नावाच्या या इयत्ता 4 मधील विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या 4 थ्या मजल्यावरून उडी मारली होती. गंभीर अवस्थेत तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हे नवीन फुटेज अमायराच्या मृत्यूपूर्वीच्या अवघ्या 1 तासातील वर्गातील मिनिटा-मिनिटाचा थरारक घटनाक्रम उघड करते. या फुटेजमुळे आता मृत मुलीचे वडील विजय मीना आणि आई शिवानी यांनी शाळेच्या निष्काळजीपणाविरोधात आणि दोषींवर कडक कारवाईसाठी नव्याने लढा सुरू केला आहे.
डिजिटल पाटी आणि अचानक बदललेले वर्तन
व्हिडिओच्या सुरुवातीला वर्गातील वातावरण अगदी सामान्य आणि नेहमीसारखेच असल्याचे दिसून येते. अमायरा नेहमीप्रमाणे वर्गात प्रवेश करते, आपल्या वर्गमित्रांसोबत संवाद साधते आणि इतर मुलांसोबत आनंदाने डान्स ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होते. परंतु, पालकांच्या दाव्यानुसार काही वेळातच तिथले वातावरण अचानक बदलते. वर्गातील काही मुले एक डिजिटल रायटिंग स्लेट (पाटी) हाताळताना दिसतात आणि ती पाटी वारंवार अमायराला दाखवली जाते. त्या पाटीवर नेमके काय लिहिले होते हे स्पष्ट नसले, तरी ती पाहिल्यानंतर अमायराच्या चेहऱ्यावरील भाव पूर्णपणे बदलतात आणि ती अस्वस्थ होऊन इतर मुलांपासून स्वतःला दूर करते.
शिक्षकेकडे वारंवार धाव आणि दुर्लक्ष
अस्वस्थ झाल्यानंतर पुढच्या 1 तासाच्या कालावधीत अमायरा सातत्यााने आपल्या जागेवरून उठून वर्गशिक्षकेकडे जाताना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ती शिक्षिकेला काहीतरी समजावून सांगण्याचा आणि मदत मागण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचे तिच्या पालकांचे म्हणणे आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा जेव्हा अमायरा शिक्षिकेशी बोलत असते, तेव्हा दुसरा एक विद्यार्थी तिथे येतो आणि शिक्षिकेचे लक्ष विचलित होते. यामुळे शिक्षिकेचे पूर्ण लक्ष अमायराच्या समस्येकडे जात नाही आणि ती कोणतीही मदत न मिळता निराश होऊन पुन्हा आपल्या बाकावर येऊन बसते.
चिंतेने ग्रासलेली अमायरा आणि वर्गाबाहेर पाऊल
मदत मिळवण्याचे प्रयत्न अपयशी ठरत गेल्याने अमायराच्या शारीरिक हावभावांमध्ये कमालीचा बदल झालेला स्पष्ट दिसतो. व्हिडिओमध्ये ती शिक्षकेसमोर हात जोडून जणू काहीतरी विनवणी करताना आणि गयावया करताना दिसते. काही वेळानंतर ती स्वतःचे तोंड हाताने झाकते आणि दोन्ही हात डोक्यावर ठेवते, जे तिच्या तीव्र मानसिक त्रासाचे आणि भीतीचे लक्षण असल्याचे पालकांनी सांगितले. एका प्रसंगी शिक्षिकेने तिला अत्यंत कठोरपणे सुनावले, ज्यामुळे अमायरा पूर्णपणे खचून गेली आणि शेवटी कोणाचेही लक्ष नसताना ती शांतपणे वर्गाबाहेर पडली. ती एकटीच जिन्यावरून वर जात असताना शाळेतील किंवा कॉरिडोअरमधील कोणत्याही कर्मचाऱ्याचे तिच्याकडे लक्ष गेले नाही.
पोलीस तपास आणि शाळा प्रशासनावर आरोप
अमायराच्या पालकांनी सुरुवातीला केलेल्या पोलीस तपासावर तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. पोलिसांनी सुरुवातीला वर्गातील घटनाक्रमाचा सखोल अभ्यास केला नाही आणि शाळा प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करण्यात हलगर्जीपणा केला, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पालकांनी आता या प्रकरणाची व्याप्ती वाढवून पुन्हा एकदा निष्पक्ष चौकशीची मागणी लावून धरली आहे. शाळेने त्या दिवशी दाखवलेली तत्परता पुरेशी होती का आणि त्यांनी नियमांचे पालन केले होते का, याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
#WATCH | Death of a 6th-class student after falling from the roof of Jaipur's Neerja Modi School in 2025 | Gurugram, Haryana: Father of the deceased student, Vijay Meena says, "It has been 8 months. CCTV footage has come to light. We demand abetment to suicide case against the… pic.twitter.com/YkR1U959Ci — ANI (@ANI) July 10, 2026
दोषींवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी
आपल्या निष्पाप मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सर्व घटकांवर कडक कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. यामध्ये बालन्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा म्हणजेच जुवेनाईल जस्टिस ॲक्ट (Juvenile Justice Act) अंतर्गत आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्याची मागणी केली जात आहे. शाळेत होणाऱ्या रॅगिंग आणि बुलिंग (Bullying) कडे दुर्लक्ष करणे किती भयानक ठरू शकते, हे या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा समोर आणले असून पालकांनी आता न्यायासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.