Jantar Mantar Season 2 : कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक आंदोलनाला अधिक तीव्र करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांनी सोशल मीडियाद्वारे घोषणा केली आहे की, दिल्लीतील प्रसिद्ध जंतर-मंतर येथील त्यांच्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणजेच 'सीझन 2' लवकरच सुरू होणार आहे. तरुण क्रियेटर्स आणि विविध जनआंदोलनांशी जोडल्या गेलेल्या 'सीजेपी'च्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर नव्याने चर्चांना उधाण आले आहे.
इन्स्टाग्रामवरील कमेंट्स आणि आंदोलनाची तयारी
अभिजीत दीपके यांनी सांगितले की, अनेक नागरिक आणि कार्यकर्ते त्यांना इन्स्टाग्रामवर थेट मेसेज व कमेंट्स करून आंदोलनाच्या पुढील टप्प्याबाबत विचारणा करत होते. "जंतर-मंतर आंदोलनाचा 'सीझन 2' नेमका कधी सुरू होणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. मी सर्वांना सांगू इच्छितो की हा नवा टप्पा लवकर सुरू होईल," असे दीपके म्हणाले. आंदोलन नेमक्या कोणत्या तारखेला आणि कोणत्या मागण्यांसाठी होणार याचा सविस्तर तपशील त्यांनी दिला नसला तरी, पक्षाची जंतर-मंतरवर पुन्हा एकदा धडक देण्याची पूर्ण तयारी असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते.
उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या मोर्चाला सीजेपीचा पाठिंबा
नुकतेच सीजेपीने उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे शाळकरी मुलांनी काढलेल्या अनोख्या मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला. हमीरपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या शाळेसाठी पक्क्या रस्त्याची मागणी करत सुमारे 300 विद्यार्थी आणि 100 पालकांनी मोर्चा काढला होता. पावसाळ्यात रस्त्यांची होणारी दुरवस्था आणि त्यामुळे शिक्षणात येणारे अडथळे यावर विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. दीपके यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करत म्हटले की, मूलभूत रस्ते कनेक्टिव्हिटी ही मागणी अनेक दशकांपूर्वीच पूर्ण व्हायला हवी होती.
दिल्लीतील बैठकीत अडथळे आणि भाजपवर गंभीर आरोप
दीपके यांनी असा दावाही केला आहे की, दिल्लीत स्वयंसेवकांची बैठक आयोजित करताना त्यांच्या पक्षाला राजकीय दबावाचा सामना करावा लागला. अनेक हॉल मालकांनी वरच्या स्तरावरून दबाव असल्याचे सांगत जागा देण्यास नकार दिला. अखेर एका हॉलचे बुकिंग मिळाले, तरीही बैठकीच्या दिवशी सकाळी मालकांना धमक्या देण्यात आल्या, असा आरोप त्यांनी केला. या सर्व अडथळ्यांसाठी त्यांनी थेट सत्ताधारी भाजपला जबाबदार धरले. 'पक्षाच्या अशा कृतींवरून ते देशातील तरुण आणि जागरूक आवाजांना घाबरतात हे स्पष्ट होते; परंतु सीजेपी अशा कोणत्याही दबावाला अजिबात बळी पडणार नाही,' असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.