ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ आणि लोकप्रिय टीव्ही शो रिव्हर मॉन्स्टर्ससाठी ओळखले जाणारे जेरेमी वेड यांनी गंगा नदीच्या पाण्यावर केलेल्या चाचणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओत वेड यांनी गंगेच्या पाण्याची साध्या पद्धतीने तपासणी करत त्याचे निष्कर्ष स्पष्ट केले आहेत.
व्हिडिओमध्ये जेरेमी वेड एका विशेष रसायनांनी तयार केलेल्या कंटेनरचा वापर करून पाण्याची चाचणी करतात. “पाणी स्वच्छ असेल तर रंग गुलाबी होतो, अन्य रंग म्हणजे धोका,” असे ते सांगतात. तुलना म्हणून ते आधी मिनरल वॉटर तपासतात. या पाण्याचा रंग गडद गुलाबी-तपकिरी होतो, जो स्वच्छ पाण्याचे लक्षण असल्याचे वेड स्पष्ट करतात.
यानंतर ते गंगा नदीचे पाणी तपासतात. या नमुन्याचा रंग फिकट तपकिरी झाल्याचे दिसते. यावर भाष्य करताना वेड म्हणतात, “हे गंगेचे पाणी आहे. याचा अर्थ यात फिकल कॉलिफॉर्म बॅक्टेरिया आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे तर या पाण्यात मानवी मलमूत्राचे प्रमाण आहे.” या विधानामुळे व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हेही वाचा: India EU Trade Deal: ‘युरोप स्वतःच्याच धोरणांना…’; भारत-युरोप संबंधांवर अमेरिका नाराज, 2007 पासून अडकलेला करार अखेर पूर्ण?
गंगेच्या प्रदूषणावर बोलताना वेड यांनी या विषयाची धार्मिक संवेदनशीलताही अधोरेखित केली. “गंगा अस्वच्छ आहे असे सांगणे अनेक हिंदूंना अत्यंत दुखावणारे वाटते,” असे ते म्हणतात. याच संदर्भात त्यांनी एका साधूंसोबत झालेल्या अनुभवाचा उल्लेख केला. तिथे त्यांना गंगेत धार्मिक स्नान करण्याचे आमंत्रण दिले होते. “नकार दिला असता तर त्यांचा अपमान झाला असता, म्हणून मी त्या विधीत सहभागी झालो,” असे वेड सांगतात.
व्हिडिओमध्ये वेड गंगेत उतरून साधूंप्रमाणे हालचालींचे अनुकरण करताना दिसतात. नंतर ते कबूल करतात की, या विधीत पोहणे अपेक्षित आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. व्हिडिओत साधू गंगेचे पाणी पिताना दिसतात, मात्र वेड ते पाणी फक्त ओठांपर्यंत नेऊन थांबतात. “मी खरोखर ताजातवाना झाल्यासारखे वाटते. पण यानंतर अतिसार किंवा याहून वाईट काही होईल का, हे वेळच सांगेल,” असे ते म्हणतात.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एकाने लिहिले, “धार्मिक अंधश्रद्धा गंगेला मारत आहेत; शहाणपणाविना शिक्षण म्हणजे दुसऱ्या प्रकारचे अज्ञान.” दुसऱ्याने म्हटले, “धर्माच्या नावाखाली संपूर्ण देश अंधाराकडे जात आहे. कोणताही धर्म विज्ञानापेक्षा मोठा नाही.” तर आणखी एकाने, “करदात्यांचे पैसे गंगा स्वच्छतेच्या नावाखाली वाया जाताना पाहणे दुर्दैवी आहे,” अशी टीका केली.
एकूणच, जेरेमी वेड यांच्या या व्हिडिओमुळे गंगा नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, श्रद्धा आणि विज्ञान यातील संघर्षावर नवी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा: Mayor Election 2026: महापौरपदाची समीकरणं बदलंली! भाजप रेसमधून आउट, राजकीय हालचालींना उधाण