कर्नाटकात पुन्हा एकदा भीषण रस्ते अपघाताची घटना घडली असून, बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील होस्कोटे परिसरात शुक्रवारी सकाळी झालेल्या साखळी धडकेत किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात होस्कोटे - दबासपेट राष्ट्रीय महामार्गावर एम. सत्यवारा गावाजवळ घडला, अशी माहिती कर्नाटक पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात एक साहित्य घेवून जाणारे चारचाकी वाहन, एक दुचाकी आणि एक मालवाहू अवजड ट्रक यांचा समावेश होता. हे वाहन होस्कोटेहून देवनहल्लीकडे जात होते. मात्र चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यानंतर परिस्थिती बिघडून साखळी अपघात झाला आणि त्यात ट्रकचाही समावेश होता.
या भीषण धडकेत या वाहनातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वारालाही प्राण गमवावे लागले. मृतांची ओळख अद्याप अधिकृतरीत्या पटलेली नसली, तरी ते बंगळुरूमधील कोठनूर परिसरातील असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सर्व मृतदेह होस्कोटे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा: Vidhan Parishad Election : मोठी राजकीय घडामोड! विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागांसंदर्भात हालचाली
या प्रकरणी प्रथम माहिती अहवाल नोंदविण्यात आला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. वाहनाचा वेग, चालकाची निष्काळजीपणा किंवा यांत्रिक बिघाड यापैकी कोणता घटक कारणीभूत होता, याची चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या आठवडाभरात कर्नाटकात घडलेला हा तिसरा मोठा अपघात आहे. रविवारी बीदर जिल्ह्यातील हमनाबाद तालुक्यात नागण्णा क्रॉसजवळ दुचाकी पुलावर आदळल्याने एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. वेंकट करतमल, त्यांची पत्नी शिल्पा आणि मुलगी रक्षिता यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा दिगंबर जखमी झाला. हे कुटुंब राजेश्वर गावचे रहिवासी होते.
तसेच कोलार जिल्ह्यातील श्रीनिवासपूर येथेही रविवारी कार उलटल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. मृतांपैकी मुनीयम्मा आणि वेंकटप्पा यांची ओळख पटली असून ते आंध्र प्रदेश येथील होते. सलग घडणाऱ्या या अपघातांमुळे राज्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा: T20 World Cup: 13 हजार नेपाळी चाहत्यांना 'त्या' फिरकीपटूने पाजले पाणी; इटलीच्या विजयाचा नायक ठरला एक सामान्य पिझ्झा विक्रेता खेळाडू, वाचा संघर्षमय कहाणी