Kerala Assembly Election Result 2026 : केरळमच्या राजकारणात या खेपेस मोठे सत्तांतर पाहायला मिळत असून मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीच्या 'लाल किल्ल्याला' काँग्रेसने भगदाड पाडले आहे. एकूण 140 विधानसभा जागांपैकी काँग्रेसने स्वतः 62 जागांवर आघाडी घेतली असून, काँग्रेसप्रणित यूडीएफ (UDF) आघाडीने तब्बल 100 जागांचा टप्पा गाठला आहे. मुख्यमंत्री विजयन यांना 'सरकारविरोधी लाटे'चा मोठा फटका बसला असून जनतेने काँग्रेसच्या हाती सत्ता देण्याचा कौल दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील विजयाने काँग्रेसला आधीच आत्मविश्वास दिला होता, ज्याचे रूपांतर आता विधानसभा विजयात झाले आहे.
अंतर्गत बंडाळीवर नियंत्रण आणि थरुर यांची भूमिका
या ऐतिहासिक यशामागे काँग्रेसने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेली अंतर्गत डागडुजी कारणीभूत ठरली. शशी थरुर यांची नाराजी दूर करण्यासाठी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना निवडणुकीच्या सहप्रभारी पदाची जबाबदारी दिली. यामुळे पक्षात एकीचा संदेश गेला आणि थरुर यांनी संपूर्ण केरळ पिंजून काढला. पक्षातील फुटाफुटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी के. सी. वेणुगोपाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश आले आणि पक्षशिस्त अधिक मजबूत झाली.
हेही वाचा - Mamata Banerjee : 'हा विजय नाही तर निव्वळ लूटमार...'; पराभवानंतर ममता बॅनर्जींचा निवडणूक आयोगासह भाजपवर हल्लाबोल
तिकीट वाटपाचे कडक धोरण आणि आश्वासने
निवडणुकीची रणनीती आखताना मधुसूदन मिस्त्री यांनी तिकीट वाटपात अत्यंत कठोर निर्णय घेतले. 'विद्यमान खासदारांना विधानसभेचे तिकीट नाही' या त्यांच्या निर्णयावर टीका झाली, तरीही त्यांनी अनुभवाच्या जोरावर योग्य उमेदवार मैदानात उतरवले. प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी दिलेले 25,00,000 रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याचे आश्वासन मतदारांच्या मनाला भिडले. तसेच मुस्लिम लीगसोबतची युती आणि ख्रिश्चन मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षात केलेले संघटनात्मक बदल काँग्रेससाठी गेमचेंजर ठरले, ज्यामुळे अल्पसंख्याक मतांचे ध्रुवीकरण काँग्रेसच्या बाजूने झाले.
सामाजिक समीकरणे आणि रणनीती
काँग्रेसने यंदा लोकसंख्याशास्त्रीय घटकांचा अत्यंत विचारपूर्वक वापर केला. मुख्यमंत्रीपदाचे तिन्ही प्रबळ दावेदार के. सी. वेणुगोपाल, व्ही. डी. सतीशन आणि रमेश चेन्नीथला हे नायर समाजाचे असल्याने या प्रभावी वर्गाचा पाठिंबा मिळवण्यात काँग्रेस यशस्वी झाली. राजकीय तज्ज्ञांच्या मते, काँग्रेसने प्रचारापासून ते मतदानापर्यंत अनेक ठिकाणी चांगली कामगिरी केली आणि मोठ्या चुका होण्याच टाळले. हीच त्यांच्या विजयाची जमेची बाजू ठरली. मुख्यमंत्री विजयन यांच्यावर केलेल्या थेट टीकेमुळे आणि विकास कामांच्या आश्वासनांमुळे केरळममध्ये अखेर काँग्रेसची लाट निर्माण झाली.
हेही वाचा - Rohit Pawar: 'जनता सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही...'; बंगालमधील विजयावरून रोहित पवारांचा भाजपवर निशाणा