Kishtwar Encounter: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादविरोधी कारवाईत महाराष्ट्राचा एक शिपाई शहीद झाला. सिंगपोरा-छत्रू भागात झालेल्या या चकमकीत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील करंडी गावचे जवान संदीप पांडुरंग गायकवाड यांनी वीरमरण पत्करले. या कारवाईत दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशेष माहितीच्या आधारे 2 पॅरा, 11 राष्ट्रीय रायफल्स, 7 आसाम रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष कृती दलाने संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 3-4 दहशतवादी या भागात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा दिल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, आणि चकमक सुरू झाली.
हेही वाचा: Covid 19 Mumbai Cases: मुंबईत पुन्हा कोविड रुग्णसंख्या वाढतेय; BMC कडून जनतेला सतर्कतेचा इशारा
भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने या कारवाईला 'ऑप त्रिशूल' असे नाव दिले असून चकमक अद्याप सुरू आहे. काही दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे, मात्र त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हालचालींना आळा घालण्यासाठी सुरक्षा दलांनी त्यांच्या ओव्हरग्राउंड वर्कर्स आणि सहानुभूतीदारांविरोधात कारवाया अधिक तीव्र केल्या आहेत. एप्रिल महिन्यात पहलगाम येथे 26 नागरिकांच्या हत्येनंतर या मोहिमेला गती मिळाली आहे.
भारताने याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानकडूनही नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामुळे अनेक घरे आणि दुकाने उद्ध्वस्त झाली असून शेकडो नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे.
शिपाई संदीप गायकवाड यांचे बलिदान हे देशासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या शौर्याला संपूर्ण देश अभिवादन करत आहे.