Aarogya Setu 2.0: देशातील डिजिटल सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण, रसायने व खते मंत्री श्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज अनेक महत्त्वपूर्ण डिजिटल आरोग्य उपक्रमांची सुरुवात केली. देशभरात परस्पर-सुसंगत डिजिटल आरोग्य सेवांचा विस्तार वेगाने करणे हा या उपक्रमांमागील मुख्य उद्देश आहे. या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी, "डिजिटल नवोपक्रमाच्या माध्यमातून निरोगी राष्ट्र उभारण्याच्या भारताच्या प्रवासातील हा एक ऐतिहासिक टप्पा आहे," अशा शब्दांत या उपक्रमांचे गौरव उद्गार काढले.
राष्ट्रीय पातळीवरील दिग्गजांची उपस्थिती
या दिमाखदार सोहळ्याला आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री तसेच आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री प्रतापराव जाधव, आरोग्य राज्यमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. एम. श्रीनिवास प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा, मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री राजेंद्र शुक्ला, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री ब्रजेश पाठक यांच्यासह केंद्रीय आरोग्य सचिव श्रीमती पुण्या सलिला श्रीवास्तव, आयसीएमआरचे (ICMR) महासंचालक डॉ. राजीव बहल आणि नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीचे (NHA) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील कुमार बरनवाल यांसारखे उच्चपदस्थ अधिकारी व लोकप्रतिनिधीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आरोग्य विश्वाचा कायापालट करणारे 'हे' 10 मोठे उपक्रम जाहीर
नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी (NHA) आणि 'NRCeS' च्या मार्गदर्शनाखाली अत्यंत आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात आलेले खालील 10 प्रमुख डिजिटल उपक्रम आजपासून देशवासीयांच्या सेवेत रुजू झाले आहेत:
आरोग्य सेतू 2.0
आयुष्मान ॲप
आयुष्मान सारथी व्हॉट्सॲप चॅटबॉट
नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज (NHCX)
इन्शुरन्स प्लॅन FHIR ऑब्जेक्ट क्रिएटर
ई-सुश्रुत क्लिनिक
युनिफाइड हेल्थ इंटरफेस (UHI)
ड्रग रजिस्ट्री
कॉमन LOINC कोड्स फॉर इंडिया (CLCI)
भारत हेल्थ टर्मिनोलॉजी सर्व्हिस (BHTS)
या सर्व तंत्रज्ञान प्रणालींमुळे आरोग्य सेवा परिसंस्थेमध्ये रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित माहितीची सुरक्षित आणि अखंड देवाणघेवाण करणे शक्य होणार असून, आरोग्य सेवेची गुणवत्ता आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर सुधारेल.
'आभा' खात्यांचा 90 कोटींचा टप्पा पार; आरोग्य क्षेत्रात 'AI' चा नवा अध्याय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली 'आयुष्मान भारत डिजिटल मिशन' (ABDM) अंतर्गत भारताने जगात सर्वाधिक वेगाने प्रगती केली असल्याचा उल्लेख श्री जे.पी. नड्डा यांनी केला. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत देशात 90 कोटींहून अधिक 'आभा' (ABHA) खाती उघडण्यात आली असून, 100 कोटींपेक्षा जास्त आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात एकमेकांशी जोडण्यात आल्या आहेत. भारताकडे आज जगातील सर्वात मोठ्या डिजिटल आरोग्य परिसंस्थांपैकी एक भक्कम व्यवस्था उपलब्ध आहे. आरोग्य सेवेत अचूकता आणण्यासाठी आता 'सही' (Sahi) आणि 'बोधी' (Bodhi) यांसारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.