JPSC Exam Cancellation : झारखंडमधील लोकसेवा आयोग (JPSC) आणि कर्मचारी निवड आयोग (JSSC) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत 2023 ते 2025 या कालावधीत पार पडलेल्या अनेक महत्त्वाच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. यामध्ये बहुचर्चित 14 व्या JPSC प्राथमिक परीक्षेचा (PT) देखील समावेश आहे. सरकारी भरती प्रक्रियेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास पुनस्थापित करण्यासाठी राज्य सरकारने हा अत्यंत धाडसी आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
गैरव्यवहारांची सखोल चौकशी; अनेक संस्था संशयाच्या भोवऱ्यात
केवळ परीक्षा रद्द करून न थांबता, सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी व्यापक चौकशीचे आदेश दिले आहेत. 11 व्या आणि 13 व्या JPSC परीक्षांसह सहाय्यक सरकारी वकील (APP), वनक्षेत्रपाल (FRO) आणि TDPL या एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या सर्वच परीक्षांची सखोल चौकशी केली जाणार आहे. TDPL या संस्थेनेच JSSC CGL ची परीक्षा आयोजित केली असल्याने, ही परीक्षादेखील आता चौकशीच्या फेऱ्यात आली आहे. विरोधी पक्षाच्या गदारोळातही मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले की, कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही आणि भरती प्रक्रियेतील ही प्रशासकीय साफसफाई अत्यंत आवश्यक बनली होती.
हेही वाचा – PM E-DRIVE योजनेला 2028 पर्यंत मुदतवाढ; पण, इलेक्ट्रिक दुचाकींच्या अनुदानात 'इतक्या' रुपयांची कपात
परीक्षा प्रणालीत आमूलाग्र बदलांची तयारी
भविष्यात परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी झारखंड सरकार संपूर्ण परीक्षा पद्धतीचा कायापालट करण्याच्या तयारीत आहे. यासाठी देशातील नामांकित संस्थांची मदत घेतली जाणार आहे. IIT, IIM आणि XLRI सारख्या अग्रगण्य शैक्षणिक व व्यवस्थापन संस्थांमधील तज्ज्ञांशी चर्चा करून एक नवी आणि सुरक्षित परीक्षा प्रणाली विकसित केली जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असला, तरी रद्द झालेल्या परीक्षा नव्याने कधी घेतल्या जाणार, याकडे आता सर्व परीक्षार्थींचे लक्ष लागून राहिले आहे.