Rojgar Mela 2026: केंद्र सरकारच्या बहुचर्चित 20 व्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देशातील 51 हजार 500 हून अधिक नवोदित तरुणांच्या हाती शासकीय सेवेचे नियुक्तीपत्र सोपवण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित या भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या उमेदवारांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. आधुनिक अर्थव्यवस्थेच्या गरजा लक्षात घेऊन भारतीय तरुणांना आवश्यक ती कौशल्ये आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी स्पष्ट केले. खासगी क्षेत्राला अधिक गती देण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांची 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' सुरू करण्यात आली असून, या योजनेद्वारे पहिल्यांदाच नोकरीत प्रवेश करणाऱ्या सुमारे 2 कोटी तरुणांना सरकारकडून 15 हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक प्रोत्साहन दिले जात आहे.
भारतीय युवा कौशल्यावर जागतिक पातळीवर वाढला विश्वास
तरुणांसाठी रोजगाराचे नवे मार्ग खुले करण्यासाठी भारताने जागतिक स्तरावर गेल्या काही वर्षांत तब्बल 40 देशांसोबत मुक्त व्यापार करार (Free Trade Agreements) केले आहेत. या ऐतिहासिक करारांमुळे भारतीय उद्योजकांना नव्या बाजारपेठा उपलब्ध झाल्या असून तरुणांसाठी करिअरच्या अमर्याद संधी निर्माण झाल्या असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. जगभरात भारतीय नवोन्मेषक, उद्योजक आणि युवा कौशल्याबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार भारतातील शिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम अधिक सक्षम केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – EPFO WhatsApp Service: EPFO ची कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठी भेट; आता व्हॉट्सॲपवर मिळणार PF ची संपूर्ण माहिती
आतापर्यंत 12 लाखांहून अधिक उमेदवारांना मिळाले रोजगार पत्र
दरम्यान, 20 वा राष्ट्रीय रोजगार मेळावा देशभरातील एकूण 45 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आला होता. या भरतीद्वारे वित्त, रेल्वे, गृह, संरक्षण तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण अशा विविध महत्त्वाच्या केंद्रीय मंत्रालयांमध्ये तरुण अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2023 पासून सातत्याने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाद्वारे आतापर्यंत देशभरात तब्बल 12 लाखांहून अधिक नियुक्तीपत्रांचे वितरण पूर्ण झाले आहे. या उपक्रमामुळे केंद्र शासकीय सेवेतील रिक्त पदे वेगाने भरली जात असून तरुणांना रोजगाराचे मोठे व्यासपीठ मिळाले आहे.