Saturday, February 14, 2026 01:03:15 PM

Tamil Nadu CM MK Stalin : "भाजप-युतीचा पराभव निश्चित!" पंतप्रधान मोदींच्या तामिळनाडू दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री स्टालिन यांचा हल्लाबोल

स्टालिन यांनी आपल्या टीकेत तामिळनाडूच्या राज्यपालांच्या कार्यपद्धतीवरही कडक शब्दांत ताशेरे ओढले. राज्यपाल हे भाजपचे एजंट असल्यासारखे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

tamil nadu cm mk stalin  quotभाजप-युतीचा पराभव निश्चितquot पंतप्रधान मोदींच्या तामिळनाडू दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री स्टालिन यांचा हल्लाबोल

Tamil Nadu CM MK Stalin on PM Modi in Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूतील चेंगलपट्टू जिल्ह्यातील मधुरंथकम येथे एका भव्य जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यापूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर प्रश्नांची सरबत्ती करत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "पंतप्रधान मोदींना तामिळनाडूची आठवण फक्त निवडणूक काळातच येते," अशी बोचरी टीका स्टालिन यांनी केली आहे. तामिळनाडूच्या जनतेने सातत्याने केंद्राकडून होणारा अन्याय सहन केला असून, आगामी काळात भाजप युतीला जनता धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्याचे प्रलंबित प्रश्न आणि निधीचा मुद्दा
मुख्यमंत्री स्टालिन यांनी आपल्या पोस्टमध्ये केंद्राकडे थकीत असलेल्या विविध निधींबाबत आणि आश्वासनांबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांनी उपस्थित केलेले काही प्रमुख मुद्दे असे आहेत:
शिक्षण निधी: तामिळनाडूचा थकीत असलेला 3,458 कोटी रुपयांचा 'समग्र शिक्षा' शिक्षण निधी केंद्र सरकार कधी रिलीज करणार?
मतदारसंघ पुनर्रचना: पुनर्रचनेनंतर (Delimitation) तामिळनाडूच्या लोकसभेतील जागा कमी केल्या जाणार नाहीत, याचे आश्वासन पंतप्रधान स्वतः कधी देणार?
तमीळ भाषा: तमीळ भाषेवर प्रेम असल्याचा देखावा करणाऱ्या केंद्र सरकारकडून या भाषेच्या विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद कधी केली जाईल?
नीट (NEET) सवलत: तामिळनाडूतील विद्यार्थ्यांची 'नीट' परीक्षेमधून सवलत देण्याची एकमुखी मागणी केंद्र सरकार कधी मान्य करणार?

पायाभूत सुविधा आणि राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
स्टालिन यांनी आपल्या टीकेत तामिळनाडूच्या राज्यपालांच्या कार्यपद्धतीवरही कडक शब्दांत ताशेरे ओढले. राज्यपाल हे भाजपचे एजंट असल्यासारखे वागत असून, त्यांची ही 'हुकूमशाही' कधी संपणार, असा सवाल त्यांनी केला. यासोबतच गेल्या 10 वर्षांपासून 'इंच-इंच' वेगाने बांधले जाणारे मदुराई येथील 'एम्स' (AIIMS) रुग्णालय कधी पूर्ण होऊन लोकांच्या डोळ्यासमोर येईल, असा टोलाही त्यांनी लगावला. नैसर्गिक आपत्तींसाठी केंद्राकडे मागितलेला मदतनिधी आणि होसूर विमानतळ तसेच कोईमतूर-मदुराई मेट्रो प्रकल्पांच्या प्रलंबित मंजुरीबाबतही त्यांनी जाब विचारला आहे.

हेही वाचा - Goa Nightclub Fire Case: लुथरा बंधूंच्या नऊ ठिकाणांवर ED चे छापे; मनी लाँडरिंगचा तपास सुरू

तामिळनाडू भाजपला पराभवाची धूळ चारणार
तामिळनाडूच्या हक्कांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या आणि राज्याशी विश्वासघात करणाऱ्या भाजप युतीचा पराभव तामिळनाडूची जनता निश्चित करेल, असा इशारा स्टालिन यांनी दिला आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या उपजीविकेवर गदा आणणारी धोरणे आणि राज्यांवर आर्थिक ओझे टाकणाऱ्या योजना बंद कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. "तामिळनाडू नेहमीच भाजपच्या अन्यायाविरुद्ध उभा राहिला आहे आणि यावेळीही निकाल वेगळा नसेल," असे मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधानांची सभा आणि विधानसभा निवडणुकीचे बिगुल
पंतप्रधान मोदींची आज मधुरंथकम येथे होणारी सभा ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या सभेत AIADMK चे सरचिटणीस एडप्पाडी के. पलानीस्वामी, जी.के. वासन, जॉन पांडियन आणि इतर मित्रपक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. ही सभा म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) प्रचाराचा शंखनाद असल्याचे बोलले जात आहे. मात्र, स्टालिन यांच्या आक्रमक पवित्रा आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे तामिळनाडूतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

हेही वाचा - Sajjan Kumar : मोठी बातमी! 1984 शीख दंगल प्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची आरोपातून निर्दोष मुक्तता


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या